Amrit Bharat Station Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते अमृत भारत स्थानक (Amruta Bharat Station Scheme) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमासाठी देशातील 508 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या स्थानकांसाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांसाठी 1696 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील स्थानकं ही नव्या स्वरुपात आणि नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत. महाराष्ट्रातील 44 स्थानकं कोणती आहेत...? काय काय सुविधा मिळणार ? याबाबत जाणून घेऊयात...
राज्यातील पाच विभागातील स्थानकांचा समावेश
महाराष्ट्रातील एकूण पाच विभागातील स्थानकांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक छोट्या आणि मोठ्या स्थानकांचं रुपडं आता पालटणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या विभागांचा समावेश करण्यात आला आहे. या पाच विभागांमध्ये खालील स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई विभाग - भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड, सँडहर्स्ट रोड
पुणे विभाग -कोल्हापूर, हडपसर, चिंचवड, सातारा, सांगली, कराड, तळेगाव, हातकणंगले, आकुर्डी, बारामती, देहूरोड, केडगाव, उरुळी, लोणंद, वाठार, फलटण
नागपूर विभाग - बल्हारशाह, बैतूल, चंद्रपूर, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, अमला, नरखेल, काटोल, पांढुर्णा, जुन्नरदेव, हिंगणघाट, मुलताई, घोराडोंगरी, गोधनी
भुसावळ विभाग - बडनेरा, मलकापूर, मूर्तिजापूर, नेपानगर, शेगाव, देवळाली, मनमाड, नांदुरा, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळे, लासलगाव, रावेर, सावदा
सोलापूर विभाग - सोलापूर, कलबुर्गी, दौंड, पंढरपूर, वाडी, कुर्डुवाडी, अहमदनगर, कोपरगाव, लातूर, शहाबाद, बेलापूर, गंगापूर रोड, दुधनी, उस्मानाबाद, जेऊर
कसं असणार या स्थानकांच नवं रुप?
आकर्षक स्थानक इमारत: स्थानकाची नवीन इमारत स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्यांना परिभाषित करणार असून आधुनिक आणि आकर्षक परिसर यामुळे प्रतिबिंबित होणार आहे .
स्वच्छ भारतावर लक्ष केंद्रित: स्वच्छ भारत मिशनला अनुसरून स्थानकात एक मॉड्यूलर सांडपाणी प्रक्रिया संयंत्र सुरू होणार आहे. ही सुविधा कार्यक्षम सांडपाणी प्रक्रिया आणि स्वच्छ परिसर सुनिश्चित करण्यात येणार आहे.
फलाटांचे सौंदर्यीकरण: भिंतींवर मनमोहक भीत्तीचित्रे काढून फलाटांचे पुनरुत्थान आणि सौंदर्याची उन्नती साधली जाणार आहे.
प्रवाशांसाठी सुविधा: प्रवाश्यांना आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि फलाटावर तसेच स्थानकाच्या इमारतीत भरपूर प्रकाश आणि वायुवीजन यांसह सुधारित सुविधांचा आनंद मिळणार आहे.
वर्धित संपर्क सुविधा: एक सुधारित फूट ओव्हर ब्रिज, अतिरिक्त लिफ्ट आणि सरकता जिना या सुविधांनी प्रवाशांची ये जा सुलभ करण्यात येणार आहे.
मार्गदर्शन आणि माहिती: आधुनिकीकृत ट्रेन इंडिकेशन बोर्ड आणि प्रवासी-अनुकूल चिन्हे स्थानक परिसरात अखंड नेव्हिगेशन सुलभ करून देणार आहेत.
कार्यात्मक सुधारणा: विद्यमान बुकिंग कार्यालय आणि इतर प्रशासकीय इमारतींचे संपूर्ण नूतनीकरण केले जाणार असून त्यांना योजनेच्या व्यापक दृष्टीकोनासह संरेखित करण्यात येणार आहे.
सर्वसमावेशकता: सर्व सुधारणा सर्वांसाठी समान उपलब्धता आणि सुविधा सुनिश्चित करून दिव्यांगजन (विशेष-सक्षम) अनुकूल बनवण्यात येणार आहे.
या नव्या उपक्रमामध्ये प्रत्येक स्थानक हे शहराचे सिटी सेंटर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये रुफ प्लाझा, शॉपिंग झोन,फूड कोर्ट, मुलांसाठी खेळण्याची जागी यांसारख्या अद्यायावत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे, बहुस्तरीय पार्किंग, लिफ्ट, एस्केलेटर, ट्रॅव्हलेटर अशा अनेक अद्यायावत सुविधा आता रेल्वेस्थानकांवर तयार होणार आहेत.
हेही वाचा :
Amrit Bharat Station Scheme : 'विरोधक ना काही करणार, ना करू देणार' : पंतप्रधान नरेंद्र मोदी