अमरावती: कोरोनाच्या संकटामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये केवळ वैद्यकीय सामग्री, अन्नपदार्थ याच गोष्टी विकण्यास परवानगी दिली गेली आहे. याचा फटका राज्यभरातील विविध व्यावसायिकांना बसतोय. अमरावती शहर हे कापडाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अमरावती-नागपूर महामार्गावर असलेल्या तीन कापडाच्या होलसेल बाजारपेठा आहेत ज्याठिकाणी महिन्याला 300 करोड रुपयाचा व्यवहार होतो. मागील एक महिन्यापासून ही बाजारपेठ बंद आहे. या बाजारपेठेत तब्बल पाच हजार कामगार आहेत. आठवड्यातून तीन दिवस बाजारपेठ उघडण्याची किंवा सामान ऑनलाईन विकण्याची तरी परवानगी द्यावी अशी मागणी या कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


Amravati Corona news | अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांसाठी कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांअंतर्गत सुधारित निर्देश


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील कडक लॉकडाऊनमध्ये ज्याप्रकारे जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी, तसेच वाईन शॉपसाठी ऑनलाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रकारे कापड मार्केटलाही ऑनलाईन व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सिटीलॅण्ड ट्रेड असोसिएशनने अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे. तीन दिवसात परवानगी मिळाली नाही तर सिटीलॅण्ड मार्केटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य होणार नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी बेरोजगारही होण्याची शक्यता असल्याचं या निवेदनातून सांगण्यात आलं आहे.



अमरावतीमधून देशाच्या प्रत्येक राज्यात रेडिमेड कापड पाठवलं जातं. मात्र, मागील एका वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय ठप्प झालाय, त्यामुळे आर्थिक संकटात ओढले गेलेले व्यावसायिक खूप अडचणीत आले आहेच. मागील वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊन लागल्याने सगळ्या व्यापाऱ्यांचं रेडिमेड कापड हे त्यांच्याकडेच पडून होतं. त्यानंतर दिवाळीच्या काळात सुद्धा त्यांच्या कापडाला फारशी मागणी नसल्याने अनेक व्यापाऱ्यांना सेल लावून रेडिमेड कापड विकावे लागले. तोटा होत असला तरी कापड विकलं जात होतं.


इंधनाअभावी अमरावती पोलीस दलातील अनेक वाहनं उभी, पैसे न दिल्यान पंप चालकांकडून इंधन देणे बंद


यावर्षी तरी एप्रिल-मे महिन्यात व्यवसाय सुरळीत होईल अशी आशा असताना परत लॉकडाऊन लागल्याने कापड व्यावसायिक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. अमरावती जिल्ह्यातून महिन्याला 600 कोटी रुपयांचा व्यवहार होतो. पण या कोरोना महामारीने सगळे व्यवसाय ठप्प झाल्याने याठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आठवड्यात फक्त तीन दिवस किंवा ऑनलाईन तरी व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कापड व्यापाऱ्यांनी केली आहे. आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतायत याकडे सर्व व्यापाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.