अमरावती : अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पोलिसांना इंधनाअभावी गाड्या उभ्या कराव्या लागल्याची वेळ अमरावती पोलिसांवर आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमधील सरकारी पोलीस वाहनं उभी आहेत. मागील आठ ते दहा महिन्यापासून पंप चालकांचे पैसे न दिल्याने पंप चालकांनी पेट्रोल-डिझेल देणं बंद केल्याने अमरावती पोलिसांवर ही वेळ आली आहे. कोरोनामुळे पंप चालकांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल-डिझेल देणं बंद केले आहे.


सध्या अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 31 पोलीस स्टेशनमधील अनेक पोलीस वाहनं जागेवर उभी असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे आवश्यकतेनुसार वाहनात डिझेल भरणं सुरू आहे आणि तेही पोलीस कर्मचारी स्वतः स्वखर्चाने डिझेल भरत आहे. तर अनेकांना वाहनं कामपुरते फिरवा असे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आपआपल्या हद्दीतच फिरण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर काही पोलीस अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना विनंती केली आणि लवकरच तुमचे थकीत रक्कम मिळेल, असा विश्वास त्यांना दिला आहे.


गृहविभागाने या बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असून पंप चालकांचे थकीत पैसे द्यावे जेणेकरून पोलीस वाहनं पुन्हा पेट्रोलिंगला पाठवत येणे शक्य होईल. कारण गस्त बंद पडली तर अवैध धंदे, चोरीचे प्रमाण वाढेल, ज्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल. 


याप्रकरणी अमरावती पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, ही अडचण आहेच, पण आम्हाला डिसेंबरपर्यंतचं थकीत पैसे मिळाले आहे. गस्त थोडी कमी झाली पण ती बंद नाही झाली, अशी प्रतिक्रिया दिली आहे.