अमरावती : लोकांमधील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी अनेक संस्था, संघटना करत असतात. मात्र, लोकांमधील अंधश्रद्धा कमी होत नसल्याचे चित्र आहे. बालकाच्या मदतीने गुप्तधन शोधाऱ्या टोळीला अमरावती पोलिसांनी (Amaravati Police) ताब्यात घेतले आहे. 
 
एका 11 वर्षीय पायाळू बालकाच्या मदतीने अमरावतीच्या टाकळी जहागीर येथील एका महिलेच्या घरात गुप्तधन शोधण्याचा प्रकार सुरू होता. या प्रकाराबाबत काही गावकऱ्यांना या प्रकाराची कुणकूण लागली. गुप्तधन शोधासाठी सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याचे आरोपींना समजताच घटनेतील सर्व आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी पळ काढला. त्यानंतर सहा आरोपींना पकडण्यात नांदगाव पेठ पोलिसांना यश आले असून घटनेने मात्र परिसरात चर्चांना उधाण आले आहे.


टाकळी जहागीर येथील मुक्ता बाभळे (65) यांच्या घरात गुप्तधन असल्याची माहिती त्यांनी जवळच्या एका व्यक्तीला दिली. गुप्तधन काढण्यासाठी एक महाराज, 11 वर्षीय पायाळू बालक आणि चार तांत्रिक व्यक्ती या महिलेच्या घरी आले. घरात पूजापाठ मांडून त्या बालकाची देखील पूजा करण्यात आली आणि घरात धन कुठे आहे यासाठी त्याला चालायला लावले. मात्र, सर्वकाही सुरळीत असताना या अघोरी प्रकारची कुणकूण गावातील काही सुज्ञ लोकांना लागताच त्यांनी या बाबत पोलीसांना माहिती दिली.


घटनास्थळी पोलीस येईपर्यंत ग्रामस्थ हे त्या महिलेच्या घरावर पाळत ठेवून बसले होते. मात्र घरात असलेल्या मांत्रिक आणि महिलेला घराबाहेरील हालचाल लक्षात येताच सर्वांनी पोलीस येण्याच्या आत तेथून पळ काढला.
      
पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होताच त्यांनी घरात मांडलेली पूजा आणि पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा पंचनामा करून मुक्ता बाभळे या महिलेला तसेच महाराज सुखदेव पाटोरकर (भांडुप) यांना ताब्यात घेतले. 


या महिलेची विचारपूस केल्यानंतर तिने सचिन बोबडे याचे नाव घेतले त्यानुसार पोलिसांनी लगेच गौरखेडा कुंभी गाव गाठून फरार झालेला आरोपी सचिन बोबडे याला ताब्यात घेतले. सचिन बोबडे याने पोलिसांसमक्ष या कृत्याची कबुली देत यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व आरोपींची नावे सांगितली आणि तपास पथक तेथूनच पुढील फरार आरोपी ताब्यात घेण्यासाठी भैसदेही (मध्यप्रदेश) येथे रवाना झाले. त्यांनी तेथून मुख्य आरोपी असलेला रामकिसन अखंडे याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी तिवसा येथील सातरगाव येथे दडून बसला होता पोलिसांच्या पथकाने तेथून रवी धिकार आणि त्या अकरा वर्षीय बालकाला ताब्यात घेतले.