Swabhimani Shetkari sanghatana : सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari sanghatana) वतीनं  अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोर्शी इथं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी, सोयाबीनला (Soybean) किमान आठ हजार रुपये तर कापसाला (Cotton) किमान 12 हजार रुपयांचा दर मिळावा, संत्रा पिकासाठी प्रकिया उद्योग उभा राहावे यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.


नेमक्या काय आहेत मागण्या?


यावेळी बोलताना रविकांत तुपकरांनी लोकप्रतिनिधीवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणाही बोलायला तयार नसल्याचे तुपकर म्हणाले. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मतद मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी रविकांत तुपकर यांनी केली आहे. विदर्भात संत्रा प्रक्रिया उद्योग झाले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. संत्र्याच्या निर्यातील प्रोत्साहन मिळालं पाहिजे. विद्युत ट्रान्सफर त्वरीत शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशा विविध मागण्या यावेळी तुपकरांनी केल्या. तसेच  सोयाबीनला किमान आठ हजार रुपये तर कापसाला किमान 12 हजार रुपयांचा दर मिळावा अशी मागणीही त्यांनी केली. वरुड-मार्शी तालुक्याला मी वाऱ्यावर सोडणार नसल्याचे तुपकर यावेळी म्हणाले.  


अतिवृष्टीनं शेती पिकांचं मोठं नुकसान


अतिवृष्टीच्या तडाख्यानं कापसासह सोयाबीन, संत्रा पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. राहिलेल्या पिकावर रोगराई पडली झाली. यामुळं फवारणीचा खर्च वाढला. मात्र, त्यातून अपेक्षीत उत्पन्न न मिळाल्यानं  लागवड खर्च निघणेही अवघड झालं आहे. कारण कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, परतीच्या पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे. सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही पीक वाया गेली आहेत. यामुळं शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. अशातच आता कापूस आणि सोयाबीनचे दर कमी होत असल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.


जलसमाधी आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून मागण्या मान्य 


सोयाबीन- कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत दाखल झाले होते. दरम्यान, या आंदोलनाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.  तुपकरांना चर्चेचे निमंत्रण देऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिड तास शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या.  सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली. राज्यस्तरावरील बहुतांशी मागण्या आम्ही तातडीने पूर्णत्वास नेवू तसेच केंद्र शासनासंदर्भात असलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन राज्य सरकारनं दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. दरम्यान, पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ravikant Tupkar : 15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलन, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर तुपकरांचा इशारा