Aurangabad News: नुकसानभरपाईच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये आज राष्ट्रवादी पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. पैठणच्या सह्याद्री चौकात हे आंदोलन करण्यात येत असून, औरंगाबाद-पैठण रस्ता आंदोलकांनी अडवून धरला आहे. नुकसानभरपाईच्या यादीतून पैठण तालुक्याला वगळण्यात आल्याने हे आंदोलन करण्यात येत असून, आंदोलनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात हे आंदोलन करण्यात येत आहे.
सप्टेंबर-अक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र असे असतांना पैठण आणि वैजापूर तालुक्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या विरोधात आज राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली पैठणच्या सह्याद्री चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील आंदोलकांनी केली.
Maharashtra Aurangabad News : 'या' प्रमुख मागण्या...
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा झालेला अवमान.
- पैठण तालुका अतिवृष्टी अनुदानापासुन वंचित ठेवल्या बाबत.
- शेती पंपाचे थकीत वीजबिलपोटी शेतकऱ्यांचे कनेक्शन न तोडणे बाबत.
- पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरलेल्या पीकविमानुसार सरसकट पीकविमा मंजूर करणे बाबत.
Maharashtra Aurangabad News : पालकमंत्र्यांचा मतदारसंघ...
औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानभरपाईची मदत जाहीर करण्यात आल्याचा पत्र जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. मात्र याचवेळी यातून औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा पैठण तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे आज भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. तर जिल्ह्यातील कोणताही तालुका वगळण्यात आला नसून, लवकरच पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसानभरपाई मदत मिळणार असल्याची माहिती भुमरे यांनी दिली आहे.
Maharashtra Aurangabad News : राज्यपालांचाही निषेध...
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात देखील यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करून त्यांच्या अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत माफी मागावी आणि त्यांना केंद्र सरकारने महाराष्ट्रातून परत बोलावून घ्यावे अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली.
Maharashtra Aurangabad News : पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी पाहायला मिळाला. पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल पाटील, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच औरंगाबाद-पैठण रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले.
मोठी बातमी! सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात 'ठाकरेंची सेना' उतरणार रस्त्यावर; चक्काजाम करणार