Amravati News : अमरावतीमध्ये (Amravati News) आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर काल खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. काल पोलिस ठाण्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. खासदार नवनीत राणा यांनी ज्या मुलीला शोधण्यासंदर्भात काल पोलिसांना अल्टिमेटम दिलं होतं ती मुलगी अखेर सापडली आहे. कालच तिचा शोध लागला असून ती साताऱ्यात सापडली. तिला आज अमरावती पोलिस (Amravati Police) घरी आणणार आहेत.  


ही मुलगी सातारा पोलिसांच्या ताब्यात होती. आज ती युवती अमरावतीला येणार आहे. काल ज्या पोलिसांसोबत खासदार नवनीत राणा यांनी खडाजंगी केली. त्याच पोलीस अधिकाऱ्यांचं भाजपने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. 


सातारा पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतले


यावेळी अमरावती पोलिस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी माहिती दिली की, ही युवती एकटी रेल्वेने प्रवास करत होती. आम्ही पुणे रेल्वे पोलीस आणि सातारा पोलिसांशी लोकेशन शेअर केलं आणि अखेर सातारा पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतले. अमरावती पोलीस साताऱ्यासाठी रवाना झाली असून ती आज (8 सप्टेंबर) अमरावतीत दाखल होईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी काल दिली.


मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana)  हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह काल थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


बेपत्ता युवतीला नेमकं कसं शोधलं?
लव्ह जिहाद प्रकरणातील युवती बेपत्ता असल्याबाबतची तक्रार संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी अमरावती पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार त्या मुलीचा शोध सुरू होता.  गोपनीय माहितीनुसार ती पुणे ते गोवा अशा प्रवासात असल्याचं समजलं होतं. त्यानुसार त्यांनी लोहमार्ग पोलीस आणि सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्यासोबत चर्चा केली होती. काल सायंकाळपासून सातारा रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलीस आणि सातारचे स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी कर्मचारी दबा धरून बसले होते.रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान गोव्याला जाणासाठी रेल्वे स्थानकावर येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला संपूर्ण रेल्वे तपासण्यास दोन मिनिट थांबणाऱ्या गाडीला किमान 5 ते 10 मिनिटं थांबवण्याबाबत परवानगी मिळावी अशी विनंती केली. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने पोलिसांना परवानगी दिल्यानंतर सर्च ऑपरेशन राबवत युवतीला ताब्यात घेण्यात आले. सातारा पोलिसांनी युवतीची चौकशी करत अमरावतीहून आलेल्या पोलिसांना या युवतीचा ताबा दिला. पोलीस सुरक्षितेत या युवतीला अमरावतीच्या दिशेने रवाना झाले आहेत.


भाजप, बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळं मुलगी सापडली- खासदार बोंडे


खासदार अनिल बोंडे म्हणाले की, धारणी अकोटमधून दोन महिन्याआधी पळवून नेलेल्या मुलीचा फोन आला. तिला मारहाण होत होती. ती मुलगी आज धारणीत येत आहे. पोलिसांची या प्रकरणी पूर्णत: अकर्मण्यता राहिली आहे. आज पोलिसांनी तिचा जबाब ऐकला. आता पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, त्या मुलांना अटक करावी, त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या घरच्यांवर गुन्हे दाखल करावेत. परवाच्या दिवशी पळवून नेलेली ती मुलगी साताऱ्यात सापडली आहे. हे यश भाजप, बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळं मिळालं आहे. दुर्दैवाने पोलिसांची भूमिका ही बोटचेपी होती. आता पोलिसांनी भूमिका घ्यावी. या मुलींचं संरक्षण झालं पाहिजे. या मुलींचं आणि त्यांच्या परिवाराचं समुपदेशन झालं पाहिजे, असंही खासदार बोडे म्हणाले. 


पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नसल्याचा आरोप


भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काल याबाबत बोलताना सांगितलं की, धारणी आणि अमरावतीच्या पोलिसांना मी विनंती केली होती की, त्या मुलींना शोधून सोडवून आणा. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये जेवढं गांभीर्य दाखवायला हवं होतं, तेवढं गांभीर्य दाखवलेलं नाही. धारणीमध्ये वीस प्रकरणं अशाच प्रकारची झाली आहेत तर अमरावतीमध्ये चार प्रकरणं झाली आहेत. या मुलींचे पालक तक्रारी घेऊन गेले तर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत, अशा नातेवाईकांच्या तक्रारी आहेत, असं खासदार बोंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या देखील काल अमरावतीतील पोलिस ठाण्यात धडकल्या. यादरम्यान पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या


'मुलीला समोर आणा' म्हणत खासदार नवनीत राणा पोलिस ठाण्यात आक्रमक, अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरण


आंतरधर्मिय विवाहात मुलींना कसं फसवतात? भाजप खासदार अनिल बोंडेंनी सांगितला पॅटर्न