Amravati News Updates: अमरावतीमध्ये (Amravati Issue) आंतरधर्मिय विवाहाच्या काही घटनांवरुन सध्या वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. आज खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं. अमरावती शहरातील आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana Live)  हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान या प्रकरणी एबीपी माझानं खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्याशी देखील संवाद साधला. यावेळी खासदार बोंडे यांनी या प्रकरणांच्या मागे एक पॅटर्न असल्याचं देखील सांगितलं. 


खासदार अनिल बोंडे सांगितलेला पॅटर्न


खासदार अनिल बोंडे यांनी म्हटलं की, यांचे पॅटर्न अनेक प्रकारचे आहेत. मुलींचे लैंगिक शोषण करणं, त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांना नशेची औषधं देणं, एवढंच नाही तर त्या मुलींच्या घरच्यांना धमक्या देणं, त्या मुलीला सांगणं की तू जर ऐकलं नाहीस तर तुझ्या घरच्यांना जीवं मारु, अशा धमक्या दिल्या जातात. या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत, असं बोंडे यांनी सांगितलं. 


खासदार बोंडे म्हणाले की, या मुलांना फंडिंग पण केलं जातं. यांना पैसे दिले जातात, गाड्या घेऊन दिल्या जातात. आतापर्यंत अमरावतीतील चार प्रकरणं माझ्याकडे आली आहे. माझं आवाहन आहे की, कोणत्याही मुलीला किंवा त्यांच्या आईवडिलांना असा त्रास दिला जात असेल तर माझ्याशी किंवा भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी कधीही संपर्क साधावा, असं अनिल बोंडे यांनी आवाहन देखील केलं आहे. 


आज नेमकं काय घडलं?
अमरावती शहरातल्या हमालपुरा भागात राहणारी एक तरुणी कालपासून बेपत्ता झाली. पण तिच्या कुटुंबियांनी तिचं अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त केली. मैत्रिणीकडून एका मुलाचं नाव समोर आलं. पण त्या मुलीचा शोध काही लागला नाही.याचाच जाब विचारण्यासाठी नवनीत कौर राणांनी पोलिसांना फोन केला. पण पोलिसांनी आपला फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर नवनीत राणांचा संताप अनावर होत गेला.  पोलिसांचाही संयम सुटला आणि मग गोष्टी आकांडतांडवापर्यंत पोहोचल्या. यावेळी नवनीत कौर राणांनी पोलिसांच्या टेबलावरचा रिमोटही आपटला. अखेरीस पोलिसांनी मुलीला शोधण्याचं आश्वासन देऊन प्रकरण तूर्तास शांत केलं. पण नवनीत कौर राणा यांनी हे प्रकरण थेट लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा केला आहे. 


पोलिसांनी एका कांदे-बटाटे विकणाऱ्या एका मुलाला अटक केली आहे. पण मुलीचा शोध 24 तासांनंतरही लागलेला नाही. त्या मुलाच्या अख्ख्या कुटुंबाला ताब्यात घ्या. तरच आपली मुलगी सापडेल, अशी मागणी कुटुंबीय करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


'मुलीला समोर आणा' म्हणत खासदार नवनीत राणा पोलिस ठाण्यात आक्रमक, अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरण तापलं


पालक तक्रारी घेऊन गेले तर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत -भाजप खासदार अनिल बोंडे