Amravati News: विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता आपोआप डोंगरदर्‍यांकडे वळू लागलेली आहेत.  दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटनस्थळावर शेकडो फूट दरीच्या टोकावर बसत तरुणांनी स्टंटबाजी करत फोटोसेशन केल्याचे दिसून आलंय.


पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची स्टंटबाजी कधी थांबणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत असून विविध पर्यटन स्थळावर घडलेल्या दुर्घटनानंतरही पर्यटक सोशल मीडियावर काहीतरी टाकण्याच्या नादात धोकादायक पद्धतीने फोटोसेशन रील करताना आढळत आहेत. 


चिखलदा पर्यटनस्थळी पर्यटकांची तुफान गर्दी


सातपुडा पर्वतरांगेतील एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा सध्या पर्यटकांच्या गर्दीने भरून गेले आहे. शेकडो फूट दरीचा काठावर असलेल्या दगडावर बसून हूल्लडबाज तरुणांनी फोटोसेशन करत जीवघेणी स्टंटबाजी केल्याचे दिसून आले. चिखलदरीत सध्या पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळत असून इथून कोसळलं तर थेट शेकडो फूट दरीत कोसळेल हे दिसत असतानाही पर्यटक धोकादायक पद्धतीने फोटोसेशन करताना दिसत आहेत. 


पर्यटनस्थळी जीवघेणी स्टंटबाजी कधी थांबणार?


हरिकेनपॉईंटवर प्रवेश नसतानाही तिथे पर्यटक गेल्याचे दिसून येत असून तरुणांनी हुल्लडबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात आणल्याचे दिसून आले. राज्यभरात पर्यटन स्थळी घडत असलेल्या दुर्घटनानंतरही प्रशासन यावर काही कारवाई करणार का? पर्यटन स्थळी जीवघेणी स्टंटबाजी कधी थांबणार ? दुर्घटना घडल्यानंतर केवळ कागदोपत्री सेल्फी आणि रील वर बंदी घालणं कितपत या हुल्लडबाजीला थांबवेल ? असे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.


भूशी धरणात सेल्फी काढताना कुटुंब गेलं वाहून


पावसाळी सहलीसाठी (Monsoon Trip) लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. 


भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले आहेत. यामध्ये लहान मुलं-महिलांचा समावेश आहे. पाच जणांमधील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत, इतर तिघांचं शोधकार्य सुरु आहेत. सहलीसाठी  गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉलमधून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.


हेही वाचा:


Bhusi Dam : हुल्लडबाजी जीवावर!धबधब्यातून भुशी धरणात वाहून गेलेलं अख्खं कुटुंब, धक्कादायक VIDEO समोर