Man Suddha Tuza  Season 2 : आमच्या घरात सगळे पिढ्यानपिढ्या डॉक्टर्स आहेत, आमच्याकडे सगळे आयएएस, आयपीएस आहेत किंवा आमच्याकडे सगळे इंजिनिअर आहेत अशी शिस्त व परंपरा चालवणारी अनेक कुटुंबे आज एका मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. गेल्या काही वर्षांत अशा शिस्तबद्ध घरांमधील काही मुलांनी इमारतीवरून उड्या मारून आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी फाशी घेतली नाही, विष घेतले नाही हे विशेष. त्यांचे कुटुंब ज्या सामाजिक उंचीवर आहे तेथून त्यांनी खरं तर स्वतःला खाली झोकून दिले आहे. या मुलांनी व त्यांच्या पालकांनी वेळीच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली असती तर... 


मनाच्या दुखण्यावर "मदत मागण्यात काहीही कमीपणा नाही", हा विचार पुन्हा एकदा ठसवण्यासाठी 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीवर 'मन सुद्ध तुझं' ही मालिका दुसरा सीझन घेऊन आली आहे. मालिकेचा पहिला भाग 14 जुलै रोजी प्रसारित झाला आहे.


तुम्ही आपापल्या जगात कितीही राजे असलात तरी मनाचा गुंता सोडवण्यासाठी मनाच्या डॉक्टरकडे जायलाच पाहिजे. परवाच्या पहिल्या भागात एक करड्या शिस्तीचे निवृत्त जिल्हाधिकारी सुहास अष्टपुत्रे डॉ. सलील देसाई यांच्याकडे येतात. त्यांच्या दोन मुलींपैकी मोठी निओमी आणि धाकटी नायशा. (जपानी किंवा हिब्रू भाषेतली ही नावे असावीत.) तर मुद्दा असा की, धाकटी नायशा कलेक्टर होण्याची कसून तयारी करत आहे. त्यामुळे वडिलांच्या मते ती हुशार आहे. 


मात्र मोठी मुलगी निओमी बंडखोर आहे. तिला अधिकारीपदाची झूल पांघरलेल्या कुटुंबाची परंपरा निमूटपणे चालवायची नाही. ती इंग्रजी साहित्य, ॲनिमेशन, पत्रकारिता असे अनेक कोर्स सतत बदलत चालली आहे. हे काही बापाला पटत नाही. त्यामुळे मग घरात भांडणे, आरडाओरडा आणि शेवटी अबोला. इथपर्यंत पडझड झाल्यानंतर वडील डॉक्टरांकडे येतात. मग डॉक्टर कुणाला काय समजावून सांगतात आणि वडील व मुलगी यांचे काय होते? हे 'आय ॲम विथ यू' या पहिल्या भागात जरूर पहा. सुहास अष्टपुत्रे पहिल्यांदा डॉक्टरांकडे येतात तेव्हा मोठ्या पदाचे ओझे असलेले ब्लेझर, टाय घालून येतात. मात्र दुसर्‍यांदा येतात तेव्हा साधे कपडे घालून व मनाने हलके होऊन येतात. हा बदल डॉक्टरांच्याही पेहरावात दाखवणार्‍या वेशभूषाकार पूर्णिमा ओक यांचे अभिनंदन व कौतुक.


या सीझनमध्ये अभिनेते सुबोध भावे मनाचे डॉक्टर आहेत. मानसोपचार तज्ज्ञाचा अभिनय करताना ऐकून घेणे व रुग्णाला बोलते करणे हे त्यांचे मुख्य काम ते उत्तम निभावतात. ज्येष्ठ अभिनेते किरण करमरकर यांनी कडक शिस्तीचा तरीही हताश बाप भेदक डोळ्यांनी साकार केलाय. जाई खांडेकरची निओमी म्हणजे साक्षात आपल्या एखाद्या मित्राची फटकळ मुलगी वाटते. (बाकी लेखक, दिग्दर्शक वगैरेंचे कौतुक मागच्या सीझनमध्ये केलेलेच आहे.)


दर रविवारी सकाळी 10.30 व रात्री 8 वाजता प्रसारित होणारे हे भाग आता यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता. हे सर्व भाग जरूर पहा. तुमच्या आयुष्यातला एखादा मनाचा गुंता कदाचित सहज सुटून जाईल.


जिथे शब्द संपतात तिथे भावनांची भाषा सुरू होते. ही भाषा समजून घेण्यासाठी 'मन सुद्ध तुझं' ही मालिका सतत सुरू रहावी.


आसिफ गोरखपुरी यांनी म्हटलेच आहे की,
सीख रहा हूँ अब मैं भी इन्सानों को पढ़ने का हुनर 
सुना है चेहरे पर किताबों से ज्यादा लिखा होता है।