Amravati Lok Sabha Election: अमरावतीत (Amravati) वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) जिल्हाध्यक्षांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
त्यामुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी दिली आहे. आज अमरावती येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला अमरावतीत मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, वंचितचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वंचितला अमरावतीत मोठा धक्का!
अमरावतीत वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांना पाठींबा जाहीर केला आहे. मात्र, रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान-सन्मान देत नाही. असे असतांना त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्या प्रचारार्थ वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनाविरुद्ध काम करावे लागणार आहे. यामुळेच समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी दिली आहे.
मतदारसंघात चौरंगी लढत, नेमका कौल कोणाला?
या मतदारसंघात महायुतीच्या वतीने खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील हे प्रतिस्पर्धी असणार आहे. अशातच महायुतीचाच (Mahayuti) भाग असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी थेट आपला उमेदवार उतरवत भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या विरोधात शड्डू ठोकलाय. अमरावतीत प्रहारने दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे रिपब्लिन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. एकुणात या मतदारसंघात रंगतदार लढत होणार आहे. असे असताना वंचितमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याने त्याचा नेमका फटका कोणाला बसतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
आंबेडकर घराण्याची एकनिष्ठ, मात्र....
आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ आहोत. मात्र, अमरावती जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्ष हा वंचित पक्षातील कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपेक्षेप्रमाणे मान-सन्मान देत नाही. तसेच निवडणूक प्रक्रियेच्या रणनीती मध्येही कुठलेही सहकार्य करत नाही. प्रामुख्याने या गोष्टी प्रकाश आंबेडकर यांना अंधारात ठेवून हा सगळा प्रकार सुरू आहे. त्यामुळे एक सामान्य नागरिक म्हणून लोकशाही बळकट करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आमची अशी भूमिका आहे की, या मतदारसंघातून निवडून येणारी जागा ही संविधान विरोधी आहे. त्यामुळे त्याला शह देण्यासाठी संभाव्य विजयी उमेदवाराला पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. असे न झाल्यास त्याचे सर्व खापर हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर फोडले जाणार आहे. त्यामुळे वंचितचा एक कार्यकर्ता आणि समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून विजय उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहणे हे महत्त्वाचे असल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या