Chandrapur : संपूर्ण देशात नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम म्हणजेच NCAP अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणाचे निष्कर्ष अलीकडेच जाहीर करण्यात आले. या सर्वेक्षणात स्वच्छ हवेसाठी अमरावती शहराने देशात तिसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. वर्ष 2022 - 23 मधील बेस्ट परफॉर्मिंग सिटीज (Best Performing Cities) या अंतर्गत सीपीसीबीने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या वर्गवारीत तिसऱ्या क्रमांकाचे 25 लाखांचे पारितोषिक अमरावती महानगरपालिकेला जाहीर झाले आहे. तर आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक प्रदूषित हवा चंद्रपूर शहराची आढळली आहे.


जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार वायू सर्वेक्षणात विदर्भातील दोन शहरात विरोधाभासी चित्र दिसून आले आहे. देशात स्वच्छ हवा असलेल्या टॉप तीन शहरातही विदर्भातील तिसऱ्या क्रमांकावर अमरावती शहराचा समावेश आहे. तर सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या शहरातही विदर्भातील चंद्रपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. हवेच्या गुणवत्तेचं अगदी परस्पर विरोधी चित्र विदर्भातील दोन शहरांमध्ये दिसून आलंय.


चंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक


अमरावती शहराचं हे चित्र जरी सुखावणारं असलं तरी याच विदर्भातील चंद्रपूर शहराने वायू प्रदूषणाचा उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जाहीर केलेल्या एअर क्वॉलिटी इंडेक्स  Air quality index (AQI) च्या आकडेवारीनुसार चंद्रपूर शहरातील हवा नोव्हेंबर महिन्यात 30 पैकी तब्बल 7 दिवस अतिशय धोकादायक, 22 दिवस धोकादायक आणि फक्त एक दिवस सामान्य होती. चंद्रपूर जिल्हा हा देशातील अग्रगण्य औद्योगिक जिल्हा आहे. देशाला सर्वाधिक कोळसा, वीज, कागद आणि सिमेंट या जिल्ह्यातून मिळतो. मात्र त्याच जिल्ह्यातील लोकांचा जीव प्रदूषणाने गुदमरला आहे.


राज्यातील किमान तापमानात पुन्हा घट


राज्यात किमान तापमानात (weather in maharashtra) पुन्हा घट झाली आहे. निफाड आणि धुळे येथे पारा पुन्हा 10 अंशांच्या खाली घसरला आहे. अशातच डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि वर्षअखेरीस कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच डिसेंबरच्या तापमानाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. राजस्थान, मध्य प्रदेश, काही उत्तरेकडील भाग, हिमालयीन प्रदेश आणि महाराष्ट्रासह दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये डिसेंबरमध्ये थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान राज्यातील सर्वच भागात तापमानात मोठी घट झाली होती. बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. मात्र, त्यानंतर तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस झाला. परिणामी महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले, तापमानात वाढ झाली आणि थंडी गायब झाली. मात्र, आता पुन्हा थंडीत वाढ झाली आहे.