Nagpur News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेडिकलच्या विद्यार्थ्याने रँगिंगचे आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी इंटर्नशिप करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. आता मात्र पीडित विद्यार्थ्यानेच 'यूटर्न' घतला आहे. त्याने रॅगिंग झालीच नसल्याचे पत्र प्रशासनाला दिले असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे रॅगिंग प्रकरणालाही कलाटणी मिळाली आहे.
मेडिकलमध्ये (GMC) रॅगिंग प्रकरण उजेडात येताच मोठी खळबळ उडाली होती. पीडित विद्यार्थ्याने दोन वेळा प्रशासनाकडे तक्रार दिली होती. तक्रारींची दखल घेत संबधित विद्यार्थ्यांना तंबीही दिली गेली होती. मात्र त्यानंतरही रॅगिंग सुरूच असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमधील विद्यार्थ्यांमध्ये रंगली आहे. नेमके त्याच वेळी पीडित विद्यार्थ्याने घुमजाव केले. त्याने तक्रार मागे का घेतली, यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहे.
पीडित विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची चित्रफीत रॅगिंग समितीने मेडिकल (Govt Medical College) प्रशासनाकडे पाठविली होती. त्यानंतर संबंधित 6 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यासह त्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले. चौकशीत ही चित्रफीत सुमारे सहा महिन्यांपूर्वीची असल्याचे आणि ती वसतिगृह क्रमांक 5 मधील असल्याचे स्पष्ट झाले. चित्रफितीत सहा इंटर्न विद्यार्थ्यांनी एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला या वसतिगृहातील गच्चीवर उभे केले होते. शिवीगाळही केली जात असल्याचे त्यात दिसते. यानंतरही पीडित विद्यार्थ्याने रॅगिंगचे आरोप मागे का घेतले, ते अद्याप स्पष्ट झाले नाही. या विषयावर प्रशासनाकडून बोलण्यास मात्र कुणीही तयार नाही. केवळ मेडिकलमधील ॲन्टी रॅगिंग समितीने या प्रकरणात पारदर्शकपणे चौकशी करूनच 6 विद्यार्थ्यांवर कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.
वसतिगृहांवर वॉर्डनचे नियंत्रण नाही
मेडिकलमधील रॅगिंग प्रकरणानंतर पुन्हा एकदा वसतिगृहांच्या निरीक्षणाबाबतचा (Hostel Warden) प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून वसतिगृहांमध्ये सहाय्यक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. काही वॉर्डन वसतिगृहातच राहतात, त्यानंतरही घटनाऱ्या घटना प्रशासकीय दुर्लक्षाकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. मुख्य वॉर्डनकडून देखभाल, नियमित भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे अपेक्षित आहे. परंतु, महिनोन्महिने भेट दिलीच जात नसल्याची माहिती समोर आली आहे. एमबीबीएस (MBBS) प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थिनीच्या रॅगिंगचा व्हिडिओ समोर आला आहे. रॅगिंगचा व्हिडिओ थेट 'अँटी रॅगिंग समिती'कडे पाठवण्यात आला होता. यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई करीत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इंटट्रनशीप करणाऱ्या 6 जणांना निलंबित केले आहे. ही घटना वसतिगृह क्रमांक 5 ची असल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाने मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई केली आहे. आता हा विद्यार्थी रॅगिंगला नकार देत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी समितीला कोणतेही पत्र दिले नसले तरी मेडिकलमध्ये दिवसभर पीडित विद्यार्थ्याने आरोप मागे घेत घुमजाव केल्याची चर्चा होती.