अमरावती : दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसह आक्रमक झालेल्या आमदार रवी राणा आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक वाद झाला. नियोजन समितीच्या बैठकीत हा वाद झाल्याने याची चर्चा सर्वत्र सुरु झाली असून या दोघांतील वाद आता विकोपाला गेल्याचं स्पष्ट झालं.
आमदार रवी राणा यांनी दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळावी, तसा ठराव जिल्हा नियोजन बैठकीत पास करावा अशी मागणी केली. त्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी नियोजन भवनाच्या बाहेरच कुजलेलं सोयाबीन जाळलं. यावेळी संत्रे, कुजलेलं सोयाबीन फेकून राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी केली. त्यानंतर नियोजन भवनात बैठक सुरू झाल्याबरोबर पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक झाली. दोघेही तू-तू मे-मे वर आल्याचं पाहायला मिळालं.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी आमदार रवी राणावर गंभीर आरोप केलेत. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावतीची ही संस्कृती नाही, अमरावतीचे काही लोकप्रतिनिधी वायफळ सारखे वागतात. आमदार रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी आहे. स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी करतात. सोयाबीन जाळून लोकप्रतिनिधींनी जे नाटक केलं ते फक्त नौटंकी होती. एखाद्या महिला लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री सोबत एक आमदारांनी कसं वागावं हे ही माहीत नाही त्यांना. स्वतःला आधी आरशात पाहावं मग बोलावं.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा आमदार रवी राणांवर थेट आरोप केला आहे. त्यांनी काय काय घोटाळे केले हे आधी सांगावं असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या. एकमेकांवर सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आता या दोघांमधील वाद विकोपाला गेला आहे.
संबंधित बातम्या :