अमरावती : जिल्हा बँक कोणाच्या ताब्यात हे राजकारण स्थानिक सत्तेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असते. पण, अमरावतीत आता 5 तारखेला पार पडलेल्या ह्या बँकेच्या निवडणुकांनंतर राजकारणाचा एक गलिच्छ चेहरा समोर आला आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी अमरावतीत मात्र काँग्रेस विरुद्ध बच्चू कडू हे चित्र निर्माण झाले आहे. आणि ह्याला कारणीभूत ठरला आहे तो म्हणजे काँग्रेस नेत्यांच्या विजयाचा सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ!
बच्चू कडूंची माय उन्मत्तपणे काढणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर अनेक वर्ष चांदुररेल्वे व धामणगाव रेल्वेचे काँगेस आमदार राहिलेले वीरेंद्र जगताप असल्याचा आरोप होतो आहे. तर ह्या घोषणेने एकही आठी चेहऱ्यावर न येता उलट हसत आहेत त्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर. तसेच ह्या सेलिब्रेशनमध्ये सामील आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख. जिल्हा बँकेत यशोमती ठाकूर ह्यांचे पॅनल विरुद्ध बच्चू कडू अशी लढत होती ज्यात यशोमती ठाकूर, जगताप ह्यांच्या पॅनेलचा विजय झाला. ही घोषणा लावणारा मी नाही असे विरेंद्र जगताप म्हणत आहेत. मात्र, त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये त्यांचाच आवाज असल्याचे बच्चू कडू समर्थकांचे म्हणणे असून हा व्हिडियो बाहेर येताच अमरावतीत ह्याचे बरेच पडसाद उमटले आहेत.
परिणामी आक्रमक मानल्या जाणाऱ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विरेंद्र जगताप यांच्या पोस्टरला चपला मारून त्यांचा पुतळा जाळला. तसेच अनेक ठिकाणी ह्याबाबत तक्रारही देण्यात आली आहे. बबलू देशमुख आणि वीरेंद्र जगताप यांच्यावर अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदूर रेल्वेत प्रहार कार्यकर्त्यांचा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्लाबोल
चांदूर रेल्वे शहरात 10 ते 12 राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समर्थकांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर सकाळी हल्लाबोल केला. यावेळी दगडफेक, विविध घोषणाबाजी करत पुतळा सुध्दा घराबाहेर जाळला. या प्रकरणी 10 ते 12 कार्यकर्ते अटकेत आहेत. यावेळी पोलीस स्टेशनवर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असुन वीरेंद्र जगताप यांच्या घरासमोरसुद्धा बंदोबस्त आहे. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक शशीकांत सातव चांदूर रेल्वेत पोहचले होते.
प्राध्यापक म्हणवणाऱ्या वीरेंद्र जगताप यांची पातळी खालावली : भाजप आमदार प्रताप अडसड
राजकारणात आरोप प्रत्यारोप होतातच. परंतु, त्याची सुद्धा एक सीमा असते. प्राध्यापक असलेल्या, सुसंस्कृत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत वैधानिक पद भुषविलेल्या व्यक्तीने ज्या पद्धतीने राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या आईच्या बाबतीत अत्यंत घाणेरडी भाषा वापरली, त्याचा मी तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया चांदूररेल्वे व धामणगाव रेल्वेचे भाजप आमदार प्रताप अडसड यांनी दिली आहे.
राजकारणात पातळी सोडून ज्या पद्धतीने सोशल मीडियावर यांच्यासह यांचे कार्यकर्ते व्यक्त होतात त्याचे कारण या पद्धतीने होणारं नेत्याचं वर्तन होय. नेतृत्व स्वतःच जर आई बहिणीपर्यंत घाणेरडी वक्तव्य करत असेल आणि सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही जर माफी मागत नाही, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक हे वक्तव्य केल्याचे सिद्ध होते, असे आमदार प्रताप अडसड म्हणतात.
असंच होत राहिलं तर वाईट परिणाम होईल : बच्चू कडू
काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप हे प्राध्यापक आहे. अशा व्यक्तींनी असे विधान करणे शोभणीय नाही. माझी आई आज 87-88 वर्षाची झाली आहे. ती पलंगावर आहे. अशा आईला जगताप यांनी शिवीगाळ केली आणि मी जेव्हा जगताप यांना बोललो तेव्हा त्यांनी टरेरी सुरू केली आहे. असंच होत राहिलं तर त्याचं वाईट परिणाम होईल अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एबीपी माझाकडे दिली.
बच्चू कडूंना महाविकास आघाडीतून काढून टाकावे : विरेंद्र जगताप
मी बच्चू कडू यांच्या आईबद्दल अजिबात अश्लील शिवीगाळ केली नाही. ती काँग्रेसची परंपरा नाहीये. बच्चू कडूंना पराभव पचवता आला नाही. शेतकरी नेते म्हणता आणि गुंडांना पोसता. माझ्या घरावर हमला करायला पाठवतात, स्वतः पंचतारांकित ओबेरॉय हॉटेलमध्ये थांबतात. महाराष्ट्राला बिहार करायला बच्चू कडू निघाले. त्यामुळे मी मागणी करणार मुख्यमंत्री यांना की, बच्चू कडू यांना महाविकास आघाडीमधून काढलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी एबीपी माझाकडे केलीय.