अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचं कुपोषणाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. खासदार नवनीत राणा यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार आणि अन्य आवश्यक वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यात मेळघाटात 49 नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याचा खासदार नवनीत राणाने तक्रार केली.
उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या आणि महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी आणि व्यंकटेश या कपन्यांना पळवाट शोधून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांच्याच गृह जिल्ह्यात इतक्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू होणे ही गोष्ट अत्यंत खेदजनक आणि लाजिरवाणी असल्याचंही खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
कंझुमर फेडरेशन मार्फत देण्यात आलेल्या या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी असल्याचे आरोप त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी 50% रकमेचा निधी समाविष्ट असतो आणि एकप्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे आणि या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.
आदिवासी माता किंवा नवजात शिशु यांच्यासाठी असणाऱ्या या लोककल्याणकारी योजनेचा लाभ प्रत्यक्षात त्यांना न मिळता त्यांच्या हिश्याचे वस्तू वाटप न करता संबंधित ब्लॅक लिस्टेड कंपनी व त्यांचे पाठीराखे हा मलिदा लाटत असून सखोल चौकशी झाल्यास हा महाभ्रष्टाचार 1000 ते 1500 कोटींचा असल्याचे सुद्धा निष्पन्न होऊ शकते, म्हणून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश द्यावे आणि दोषींविरोधात एफआयआर नोंदवावा आणि कोणी कितीही मोठे असले तरी या संपूर्ण प्रकाराची पाळेमुळे खोदून काढून त्यांना कठोर शिक्षा करावी आणि आदिवासींना न्याय द्यावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.
कंत्राटदारांच्या प्रेमापोटी हा तर महाराष्ट्राचा आणि अंगणवाडीताईंचा अपमान : मंत्री यशोमती ठाकूर
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला असून काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे, महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम राणा यांनी केलं आहे असे प्रत्युत्तर पालकमंत्री तथा महिला व बालसिकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. तसेच या संपूर्ण प्रकारामुळे आपण प्रचंड व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, कुपोषणाच्या विरोधात मी मंत्री झाल्यापासून व्यापक चळवळ हाती घेण्यात आली. सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र अशी घोषणा देऊन राज्य सरकारने जे काम केलं त्याला गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्वतः पहिल्या क्रमांकाचं बक्षिस देऊन गौरवलं आहे. तरीसुद्धा एकही बालक कुपोषित राहता कामा नये म्हणून आपण पोषण अभियानाची जनजागृती चळवळ वर्षभर राबवत आहोत. कोविड काळातही कड्याकपाऱ्यातून अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका दुर्गम भागात जाऊन पोषण आहार पोचवत आहेत. मेळघाटात मी स्वतः अनेक दौरे केले आहेत. तिथे मुक्काम करून सर्व यंत्रणा कशी जोमाने काम करेल यासाठी प्रयत्न केले आहे.
मेळघाटातील कुपोषणाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. पण आज चमकोगिरी करत आदिवासी भागात फक्त फोटोसेशन आणि क्रिकेट खेळायला जाणाऱ्या नवनीत राणा यांनी सर्व आदिवासी समाज, अमरावतीकर यांचा अपमान केला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही बालमृत्यूंचं प्रमाण कमी येऊ शकलं नव्हतं. आता ज्या 49 बालमृत्यूच्या बातम्या येत आहेत त्याप्रकरणात शासनाने याआधीच उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे. फक्त चमकोगिरी करायची यासाठीच नवनीत राणा यांचा सगळा आटापिटा असल्याचं दिसतंय असंही त्या म्हणाल्या. खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आलंय असा सवालही यशोमती ठाकूर यांनी केला आहे. कुठल्या कंत्राटदारांसाठी हा आटापिटा सुरूय? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या निकषांच्या आधारे पोषण आहाराचं काम देण्यात आले होते, कोविडमुळे काम ठप्प पडू नये म्हणून तीच रचना कायम ठेवण्यात आली होती. कोविड काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका आणि समस्त अमरावतीकरांचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असे ही त्या म्हणाल्या.