अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) रद्द केल्यानंतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचीही आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.  निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने निवडणूक आयोगाने येत्या सहा महिन्यात यासंदर्भात रवी राणा यांच्यावर कारवाई केली जाईल असं शपथ पत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलं आहे..


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी आधीच वाढलेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे..16 नोव्हेंबरला त्याचा अंतिम निकाल लागणार आहे. त्यातच आता त्यांचे पती आमदार रवी राणा यांची आमदारकी धोक्यात येते की काय अशी शंका उपस्थित होत आहे.



निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च?


बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे येत्या सहा महिन्यात रवी राणा यांच्यावर कारवाई करणार असल्याचे निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिलेल्या शपथ पत्रात सांगितलं. आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे आढळून आले आहे. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी 25 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला आहे. परंतु या प्रकरणात अनेक महिन्यापर्यंत काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे अमरावती शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी याचिका दाखल करण्यात आली होती.



काय म्हणाले रवी राणा 


याप्रकरणी आमदार रवी राणा म्हणाले की, माझ्या विरोधात याचिका टाकणारे हे आनंदराव अडसूळ यांचे पिलांटू आहेत. मी माझा खुलासा दिलेला आहे. माझ्यावर आरोप करत जे खर्च दाखवलेले आहे तो खर्च आमचा नाही. एखाद्या कार्यक्रमात जर मी पाहुणे म्हणून गेलेलो असेल तर तो खर्च माझ्यावर दाखवला आहेत.  याची सगळी वकिली परिवहन मंत्री अनिल परब पाहत आहेत. त्यांच्याच माध्यमातून या लोकांनी याचिका टाकलेली आहे. आनंदराव अडसूळ हे रुग्णालयात बसून दिवास्वप्न पाहताय की रवी राणाची आमदारकी जाईल. हे चुकीचं स्वप्न आहे. मी माझी बाजू तयार ठेवली असून मला नोटीस आल्यावर मी माझा जबाब देईल असं आमदार रवी राणा म्हणाले.