Rohit Patil on Tata Airbus Project : राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवण्याचे "उद्योग" सुरुच असल्याने महाविकास आघाडी सरकारने शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून एकाच राज्यात का नेले जात आहेत? इतर राज्य असताना फक्त गुजरातलाच प्रकल्प का नेले जात आहेत? हा प्रश्न असल्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटलांनी टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्याने हल्लाबोल केला. 


रोहित पाटील सांगलीच्या अंजनीमध्ये बोलत होते. देशात महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर असताना महाराष्ट्रातील प्रकल्प एकामागून एक गुजरातमध्ये जात आहेत, देशात अनेक राज्य असताना फक्त गुजरात मध्येच हे प्रकल्प का जात आहेत? हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नसून तरुणांनी याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. 


रोहित पाटलांचा केजरीवालांना टोला 


नोटांवरील फोटो बदलण्याच्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर सुरू झालेल्या वादावरून बोलताना रोहित पाटील यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, अनेक नेते आज नोटा बदलण्याची मागणी करतात. मात्र, नोटा बदलून देशाची अर्थव्यवस्था बदलेलं अशी परिस्थिती नाही. नोटा पुन्हा छापणे हे देशहिताचे नसून चेहरा चांगला नसेल, तर आरसा बदलून काही होत नाही. त्याला चेहरा चांगला करावा लागेल, असा टोल नोटांवरील फोटो बदलण्याच्या मागणी करणाऱ्या नेत्यांना रोहित पाटलांनी लगावला.


अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? 


वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार ? अशी विचारणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली. ट्विटच्या माध्यमातून भाष्य करताना ते म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा 22 हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते. 


महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असे ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या