Nagpur News : राज्यातील भाजपा-शिंदे गट या सत्ताधारी पक्षातल्या अमरावती जिल्ह्यातल्या दोन नेत्यांमध्ये आर-पारची लढाई सुरु झाली आहे. सुरुवातीला शीतयुद्ध दिसणाऱ्या या प्रकाराने आता गंभीर वळण घेतले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. दोघांनीही एकमेकांवर आरोप करताना पातळी सोडल्याचे दिसून येत आहे. हे दोन नेते म्हणजे बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू. 


सुरुवातीला रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप केला. त्याशिवाय हा 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आक्रमक पवित्रा घेत 'एका बापाचा असन, त त्येनं पुरावे द्यावे. आरोप सिद्ध झाला त त्येच्या घरी भांडे घासाले जाईन,' असे आव्हान बच्चू कडूंनी दिले. यासाठी त्यांनी 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटमही राणांना दिला. तसेच खुलासा केला नाही तर आम्ही धमाका करु, असाही इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. यासाठी आमदार कडूंनी नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. 


फुटलेल्या फटाक्यांपैकी 'हा' फुसका फटाका


बच्चू कडू यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार रवी राणा यांनी ट्वीट करुन बच्चू कडूंना प्रत्युत्तर दिले आहे. हा एक विझायला आलेला दिवा आहे आणि दिवा विझायच्या आधी फडफड करतो आणि दिवाळीत फुटलेल्या फटाक्यांपैकी 'हा' फुसका फटाका आहे, असे बच्चू कडूंना उद्देशून राणांनी म्हटले आहे. आता हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. बच्चू कडू आता कोणत्याही थराला जायला तयार आहेत. कारण 'हा माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍न आहे', असे म्हणत त्यांनी कुणी कितीही फटके देण्याचा प्रयत्न केला तरी मागे हटणार नाही, असे काल सांगितले. त्यावर रवी राणांचे ट्वीट महत्वाचे ठरत आहे. ट्वीटमध्ये राणा म्हणतात, दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे.'


पैसे दिले असतील तर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा


गुवाहाटीला जाऊन आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. पैसे दिले असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तसे सांगावे किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तरी तसा खुलासा करावा, अशी मागणी कडू यांनी केली आहे. पैसे घेतले नाही, हे मी सांगत आहो, दिले असतील तर त्यांनी सांगावे, असे अप्रत्यक्ष आवाहनच बच्चू कडू यांनी दिले आहे. आता हा संघर्ष दिवसागणिक गंभीर वळण घेत आहे. हा संघर्ष कुठे जाऊन थांबणार, या दोन नेत्यांच्या भांडणाचा निकाल काय लागणार, याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळासह जनसामान्यांना लागली आहे.


महत्त्वाची बातमी


Coronavirus : कोरोना संसर्गात वाढ, देशात दोन हजार 208 नवीन कोरोनाबाधित, 12 रुग्णांचा मृत्यू