Narendra Dabholkar Murder Case : फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशातील पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी न्याय झाला असून दोन आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, ज्यांच्यावर कटाचा आरोपा होता तो वीरेंद्र तावडे मात्र पुराव्याअंभावी निर्दोष सुटला आहे. अन्य दोन आरोपींची सुद्धा निर्दोष सुटका झाली आहे. 11 वर्षानंतर दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये दोन आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालानंतर दाभोलकर कुटुंबियांकडून (Narendra Dabholkar Murder Case) समाधान व्यक्त करण्यात आलं असलं, तरी निर्दोष सुटलेल्या तीन आरोपींविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे.
चौघांच्या हत्येत समान धागा
या सर्व पार्श्वभूमीवर आता नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडामधील आरोपींना शिक्षा झाली असली, तरी अजूनही गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी अजूनही सापडलेले नाहीत. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या घडल्यानंतर ज्या पद्धतीने गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली त्यामध्ये एकच विचारधारा आणि समान दुवा असल्याचं पोलिसांचा कयास आहे. मात्र, तपास अजूनही म्हणावा तितक्या वेगाने रखडलेला नाही.
चौघांची हत्या कधी घडली?
गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ज्या पद्धतीने दाभोलकरांची हत्या झाली त्याच पद्धतीने ही हत्या झाली होती. यानंतच अवघ्या चार महिन्यांमध्येच 2015 मध्येच ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 2017 मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची 2017 मध्ये हत्या करण्यात आली होती. त्यामुळे दाभोलकरांपासून ते गौरी लंकेश यांच्या हत्येपर्यंत एकच समान धागा आणि हत्या करण्याची पद्धत दिसून आली आहे.
गोविंद पानसरे हत्यांकांडात नेमकं काय घडलं?
गोविंद पानसरे हत्याप्रकरणी (Govind Pansare Murder Case) आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील सहा आरोपी बंगळूरमध्ये कैद आहेत, तर चार आरोपी पुण्यामध्ये कैद आहेत. या खटल्याची सुनावणी कोल्हापूरमध्ये सुरू आहे. पानसरे हत्याकांडमधील आरोपी वीरेंद्र तावडेला जिल्हा न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्येच करावी अशी सूचना केली होती.
गोळी घालणारे आरोपी अजूनही मोकाट
पानसरे हत्या प्रकरणात आतापर्यंत एसआयटीकडून 15 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. मात्र, एकूण 42 साक्षीदार तपासले जाणार आहेत. हा खटला उभारण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं शस्त्र मात्र अजूनही सापडले नाही. ज्या शस्त्राने पानसरे यांच्यावरती गोळी झाडण्यात आली, ते शस्त्र अजूनही सापडलेलं नाही. ज्यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे ते दोन मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांनी वापरलेली गाडी सुद्धा हाताला लागलेली नाही. आरोपींना शिक्षेपर्यंत नेण्यासाठी खटल्यातील महत्त्वपूर्ण हे तीन घटक असतानाही ते सापडत नसल्याने कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
तावडेचा मंजूर जामीन रद्द करण्याची मागणी
दरम्यान, या पानसरेंच्या खुनाचा कट रचण्यापासून ते गुन्हेगारांना शस्त्र आणि दुचाकी पुरवण्यापर्यंत संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडेचा सहभाग असल्याचे संशयितांच्या जबाबात समोर आलं आहे. 9 मे रोजी कोल्हापुरात झालेल्या सुनावणीत तावडेविरोधात भक्कम पुरावे असल्याने जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे जामीन रद्द व्हावा, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला आहे. गोविंद पानसरे यांच्या खुनाचा कट, बेळगावातून शस्त्र उपलब्ध करणे, मारेकऱ्यांना प्रशिक्षण, कोल्हापूर, बेळगावसह विविध ठिकाणी राहण्याची सोय करणे, गुन्ह्यात वापरण्यासाठी दुचाकीची खरेदी करण्यात तावडेचा सहभाग होता.
दाभोलकर हत्याकांडात तावडेची निर्दोष मुक्तता
विशेष म्हणजे नरेंद्र दाभोलकर हत्यांकाडातही वीरेंद्र तावडेचा समावेश होता. मात्र, त्याची सबळ पुरावा नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. तावडेनं बेळगावातून चोरीतील दुचाकी 10 हजारामध्ये खरेदी केली होती. तीच लाल रंगाची दुचाकी मारेकऱ्यांनी पानसरे यांच्या खुनात वापरली होती. तावडेनं बेळगावातून आणलेलं शस्त्र मारेकऱ्यांना पुरवले होते. गुन्ह्यानंतर त्यानेच शस्त्राची विल्हेवाट लावली होती. कर्नाटकातील एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात अटक असलेले शरद कळसकर तसेच वासुदेव सूर्यवंशीच्या जबाबात तावडेची कुंडली बाहेर आल्याने पानसरे केसमधील सरकारी वकिलांनी सांगितलं आहे.
गौरी लंकेश प्रकरणात काय घडलं?
दरम्यान, गौरी लंकेश (Gauri Lankesh) हत्या प्रकरणातील आरोपी मोहन नायकला कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एस विश्वजीत शेट्टी यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मोहन नायक या प्रकरणातील पहिले आरोपी असून, त्याला जामीन मिळाला आहे. न्यायालयाने आरोपीला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या आणखी दोन जामिनावर जामीन मंजूर केला आहे. आरोपी नायक गेल्या पाच वर्षांपासून म्हणजेच 2018 पासून पोलिसांच्या ताब्यात होता. सुनावणीला दिरंगाई झाल्याने जामिनासाठी अर्ज केला होता.
कर्नाटक हायकोर्टाने सांगितले की, आरोपी 18 जुलै 2018 पासून कोठडीत आहे. तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकू शकत नाही. आरोपीचे जबाब नोंदवून तो पाच वर्षे पोलिस कोठडीत राहिला. खटल्याला विलंब होत असल्याच्या कारणावरून जामिनासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने सांगितले की, केवळ 90 जणांची चौकशी झाली आहे.
दरम्यान, 11 फेब्रुवारी 2019 रोजी कोर्टाने ट्रायल कोर्टाला खटला लवकर निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. 30 ऑक्टोबर 2021 रोजी या प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले होते, परंतु दोन वर्षांहून अधिक काळात आतापर्यंत केवळ 90 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपपत्रात 527 साक्षीदारांची नावे आहेत. यापैकी केवळ 19 जणांची चौकशी झाली आहे. 400 हून अधिक साक्षीदारांची चौकशी व्हायची आहे.
एमएम कलबुर्गी हत्याकांडात काय घडलं?
दुसरीकडे, चार महिन्यांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एमएम कलबुर्गी (M. M. Kalburgi) आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या खटल्यांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश दिले होते. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी प्रदीर्घ खटल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात आतापर्यंत 18 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि 1,200 पुरावे आणि 500 साक्षीदारांसह आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. गौरी लंकेश प्रकरणातील खटला जुलै 2022 मध्ये सुरू झाला आहे. सिद्धरामय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार गौरीची बहीण कविता लंकेश यांनी खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची मागणी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या