N. D. Patil Passed Away : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 


वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. 


प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च  केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केलं होतं. 


राजकीय कारकिर्द : 



  • 1948 : शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

  • 1957 : मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

  • 1960-66,1970-76,1976-82 अशी 18 वर्षं महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

  • 1969- 1978, 1985 – 2010 : शे.का.प.चे सरचिटणीस

  • 1978-1980 : सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य

  • 1985-1990 : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

  • 1999-2002 : निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख नेते


एन. डी. पाटील यांना मिळालेले सन्मान /पुरस्कार



  • भाई माधवराव बागल पुरस्कार : 1994 

  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड : डी. लीट. पदवी, 1999

  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद ) भारत सरकार : 1998 – 2000

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : डी.लीट.पदवी, 2000

  • विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद : 2001

  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : डी. लीट. पदवी

  • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha