India Weather Update : सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. मागील आठ दिवसांपासून दिल्लीत देखील जोराची थंडी आहे. आज दिल्लीसह, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान याठिकाणी थंडी कायम असून, वातावरणात बदल झालेला नाही. सध्या तरी थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही थंडीचा जोर कायम आहे. आज धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 7.5 अंशावर स्थिर राहिला असून, जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर परभणीचे तापमान हे 11.2 अंशावर गेले आहे. त्याचबरोब बीडमध्येही थंडीचा कडाका कायम आहे. बीड शरहार धुक्याची चादर पसरली आहे. दरम्यान या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गेल्या काही दिवसापासून बीडमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. आज बीड शहर पूर्ण धुक्यात बुडून गेलं आहे. शहरात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. अगदी कश्मीर आणि महाबळेश्वरला सकाळी जशी धुक्याची चादर पसरते तसेच दृश्य सध्या बीडमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे रस्त्यावरून वाहन चालवायला देखील वाहनचालकांना त्रास होत आहे. थंडीचा कडाका वाढत असून यामुळे काही प्रमाणात रब्बी पिकाला धोका निर्माण आहे. 





 


अहमदनगर शहरासह परिसरात सकाळपासून दाट धुकं पसरले आहे. सकाळपासून शहरात असलेल्या धुक्याच्या चादरीमुळे शहरातील वाहनांचा वेळ मंदावला आहे. शहर आणि परिसरामध्ये धुकं असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यावर रहदारी देखील कमी पाहायला मिळत आहे. या धुक्याचा परिणाम शहरातील नागरिकांवर झाला आहे. याचबरोबर परिसरातील हरभरा आणि कांदा पिकांना देखील धोका निर्माण झाला आहे. धुक्यामुळे हरभरा आणि कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लातूर आणि परिसरात आज सकाळी आठ वाजेपर्यंत दाट धुके पडले होते. शहरातील गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तर शहराच्या बाजूला असलेल्या रिंग रोड भागातही धुके जाणवत होते.  


दरम्यान, रविवारी जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये किमान तापमानात किंचित सुधारणा झाली. हवामान विभागाने जम्मू काश्मीरमध्ये पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. 16 ते 19 जानेवारीदरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या मैदानी भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टीसह होईल. तर उंच भागात हलकी ते मध्यम हिमवृष्टी होईल. जानेवारीच्या शेवटपर्यंत कोणत्याही मोठ्या पावसाचा किंवा बर्फवृष्टीचा अंदाज नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.



राजस्थानच्या अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी आणि धुके कायम आहे. राज्याच्या काही भागांमध्ये थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील एकमेव हिल स्टेशन असलेल्या माउंट अबू येथील रात्रीचे तापमान गेल्या तीन ते चार दिवसांपासून शून्याच्या खाली नोंदवले गेले. शनिवारी करौली हे राज्यातील सर्वात थंड ठिकाण ठरले असून रात्रीचे तापमान 2.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राजधानी जयपूर, अजमेर, भीलवाडा, पिलानी, बनस्थली, सीकर, कोटा, चित्तौडगड, दाबोक (उदयपूर), बिकानेर, चुरू आणि गंगानगर या भागात हलके ते मध्यम स्वरुपाचे धुके पडले आहे.


या राज्यांमध्ये होणार पाऊस


16 जानेवारीपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा एकदा हिमालयात सक्रिय झाला आहे. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेशात बुधवारपर्यंत कडाक्याची थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. आज आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पुढील चार ते पास दिवसात रायलसीमा, तामिळनाडू, केरळ आणि माहे येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय, 19 आणि 20 जानेवारीला अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांमध्ये मेघगर्जनेसह  मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.