Maharashtra Rain News : राज्यातील काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या (Agriculture) कामांना वेग आला असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज राज्यातील हवामान नेमकं कसं असेल, याबाबतची माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा अंदाज.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दमदार पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून चांदोली परिसरामध्ये चिक्कलगुट्टा भात रोप लागलीस सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे चांदोली परिसरामध्ये अतिवृष्टी व दमदार पावसाने या परिसरातील सर्व धबधबे प्रवाहित झाले असून ते पर्यटकांच्यासाठी साद घालत आहेत. चांदोली धरणात एकूण 14.52 टीएमसी तर 7.64 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पाऊस सुरु झाल्यापासून पाणीसाठ्यात 4.22 टीएमसीने वाढ झाली आहे. या चालू वर्षी आतापर्यंत 941 मिलिमीटर पाऊस पडला असून 16038 ने पाणी क्यूसेक्कने धरणांमध्ये येत आहे तर नदीपात्रात 675 मिलिमीटर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. आत्तापर्यंत 15.85 टीएमसी म्हणजे 46.8 टक्के धरण भरले आहे.
मालेगाव तालुक्यातील पिके धोक्यात, पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत
गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एकदाच पावसाने हजेरी लावली आहे. त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या आहेत. मात्र, पावसाने पाठ फिरवली अन् शेती पिके संकटात सापडली आहे. पिके करपू लागल्याने पिकांना वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. विहिरीत असलेल्या पाण्याचा उपयोग करुन घेत मालेगाव तालुक्यातील शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करत आहेत. किमान पाऊस पडेपर्यंत या पाण्यावर तरी पिके जगतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाच्या पाण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या: