Coronavirus : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण
Maharashtra Minister Balasaheb Thorat tests positive for Covid-19 : बाळकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे आणि वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
Maharashtra Minister Balasaheb Thorat tests positive for Covid-19 : महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत माहिती दिली. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढील उपचार घेणार आहोत, असे थोरात यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राज्यातील जनतेलाही मास्कचा वापर करण्याचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्वीटमध्ये केलं आहे. याआधी बाळकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे आणि वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी. '
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2021
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
राज्यात गुरुवारी 5 हजार 368 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटचं संकटही गडद होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज तब्बल 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1193 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आज 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 18 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 7 हजार 330 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.55 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 33 हजार 748 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 88 , 87, 303 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात आज 198 ओमायक्रॉनबाधितांची नोंद -
राज्यात आज 198 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 450 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 125 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.