RBI Action On Banks : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून महाराष्ट्रातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. जाणून घ्या कोणत्या बॅंका आहेत, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तीन बँकांवर नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे. 


महाराष्ट्रातील 'या' तीन बॅंकावर कारवाई
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक, द यवतमाळ को-ऑपरेटिव्ह बॅंक लि., वरुड को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. या तीन बॅंकावर दंडात्मक कारवाई आहे. 


...यामुळे ठोठावला दंड


आरबीआयनं अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकांसाठी आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर केवायसीप्रकरणी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला 3.50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेनं आरबीआयनं सहकारी बॅंकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि केवायसीप्रकरणी 1 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बँकांकडून नियमांचे पालन न केल्यास रिझर्व्ह बँक दंड आकारत असते. या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांवरही परिणाम होत असतो.


भारतातील एकूण 8 को-ऑपरेटिव्ह बॅंकांना दंड 


भारतातील काल एकूण आठ को-ऑपरेटिव्ह बॅंकांना आरबीआयकडून दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला 40 लाखांचा दंड, छत्तीसगड राज्य सहकारी बॅंक मर्यादित, रायपूरला 25 लाखांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. तर मध्य प्रदेशातील जिल्हा सहकारी केंद्रीय बॅंक मर्यादीत, छिंदवाडा आणि गऱ्हा को-ऑपरेटिव्ह बॅंक यांना एक-एक लाखांचा दंड तर द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक, पणजी येथील बॅंकेवर 2.51 लाखांची आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 


जुलै महिन्यात 'या' बॅंकावर कारवाई


यापूर्वी जुलै महिन्यात द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक (The Nashik Merchants Co-operative Bank), महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (Maharashtra State Cooperative Bank) या बॅंकावर आरबीआयनं कारवाई केली होती. यावेळी रिझर्व्ह बँकेने या कारवाई संदर्भात एक निवेदन जारी केले होते. तसेच यात RBIने म्हटलं होतं की, मुंबईतील 'महाराष्ट्र राज्य सहकारी बँके'ने फसवणूक आणि देखरेख संदर्भात जारी केलेल्या नाबार्ड निर्देशांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बँकेला 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.