मुंबई : अवध्या काही तासांमध्ये लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून आचारसंहिता लागू होणार आहे. त्यापूर्वीच शिंदे सरकारकडून (Maharashtra Cabinet Meeting) निर्णयाचा धडाका लावणार असल्याचं पाहायला मिळतंय. कारण उद्या म्हणजेच 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. तसेच एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Meeting)  विक्रमी तीन बैठका झाल्या आहेत.  पण आचारसंहिता लागू होण्याआधीच पुन्हा एकदा मंत्रीमंडळाची बैठक बोलवण्यात आलीये. उद्या सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 


तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. आता अवघ्या काही तासांमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे राज्यात महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय आणि आदेश काढण्याचा धडाका सुरु आहे.  


अवघ्या 48 तासांमध्ये राज्य सरकारने घेतले महत्त्वाचे 26 निर्णय


राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याबरोबरच वेल्हे तालुक्याचे नामांतर करण्यास मान्यता देण्यात आली.  यापूर्वी 11 मार्चला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 18 महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये राज्य सरकारने आणखी 26 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 


आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा


 शेतकऱ्यांच्या (Farmers) एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प–जनसमर्थचा शुभारंभ दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. 'सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजीटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.


दरम्यान उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणत्या निर्णयांचा पाऊस पडणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या या बैठकीकडे सध्या सर्वांच्या नजरा आहेत. 


ही बातमी वाचा : 


ABP Majha Opinion Poll: पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामगिरीवर महाराष्ट्रातील जनता समाधानी आहे का? पाहा एबीपी माझाचा ओपिनियन पोल