Loksabha Election 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम उद्या, 16 मार्चला जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) ही माहिती देण्यात आल्याने उद्यापासून देशातील वातावरण निवडणूकमय असेल. यासोबत मुदत संपत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा सुद्धा कार्यक्रम घोषित होणार आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commission) उद्या नवी दिल्ली येथे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यानंतर देशभरात निवडणुकांची आचारसंहिता लागू होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने आपली प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी शासन दरबारी एकच गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. नागपूरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घर असेल किंवा मुंबई येथील मंत्रालयात आज नागरिकांची एकच लगबग बघायला मिळत आहे.
शासन दरबारी नागरिकांची एकच गर्दी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आज नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. आपली रखडलेली प्रलंबित कामे मार्गी लागावे यासाठी नागपूरकरांनी आज उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर निवासस्थानी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. तर असेच काहीशी परिस्थिती आज मंत्रालयात देखील बघायला मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने उद्या देशभरात आचारसंहिता जाहीर होणार असल्याने शासन दरबारी काही महत्वपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी नांगिरकांनी एकच लगबग केली आहे. परिणामी मंत्रालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे.
निवडणूक आयोगाकडून उद्या पत्रकार परिषद
निवडणूक आयोगाकडून उद्या 16 मार्च रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे दुपारी 3 वाजल्यापासून ही पत्रकार परिषद होणार आहे. यात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत. यामध्ये ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. यासोबतच देशभरात आचारसंहिताही लागू होणार आहे. तत्पूर्वी, एक दिवस आधी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू या दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. आजच दोघांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
यानंतर आयोगाच्या तिन्ही अधिकाऱ्यांची निवडणूक कार्यक्रमासंदर्भात बैठक झाली. तर दुसरीकडे, 4 राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय दलाचे 3.4 लाखांहून अधिक जवान तैनात केले जातील. सैनिकांची पहिली तुकडी 1 मार्च रोजी देशातील अतिसंवेदनशील भागासाठी रवाना झाली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिसंवेदनशील मतदारसंघांमध्ये मतदानपूर्व तैनातीचा भाग म्हणून सुमारे 2,000 कंपन्या तैनात केल्या जातील. ज्यामध्ये सुमारे दीड लाख सैनिक असतील. देशात सात तर राज्यात तीन टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या