मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याला अटक करण्यात आली असून त्याला आता 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु, या प्रकरणावरून कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. हिंदुस्थानी भाऊच्या मागे असलेली सोशल मीडिया कंपनी भाजपच्या कार्यकर्त्यांची असून हिंदुस्थानी भाऊ हे भाजपच्या आयटी सेलचं प्रॉडक्ट आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. 


सचिन सावंत यांनी काल ट्विट करून भाजपवर अनेक आरोप केले होते. "हिंदूस्थानी भाऊ याला सोशल मीडियावर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजप/संघाच्या संबंधित लोकांची होती. अनेक वेळा हा व्यक्ती द्वेषपूर्ण व शिवीगाळ युक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते." असे ट्विट काल सावंत यांनी केले होते. 






सचिन सावंत यांच्या या ट्विटनंतर आज एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी सचिन सावंत म्हणाले, "महाविकास आघाडीविरोधात विद्यार्थी आणि लोकांना भडकवण्यासाठी हिदुस्थानी भाऊचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे.   


"देशात द्वेष पसरवण्यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच हिंदुस्थानी भाऊसारखे काही लोक तयार केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानी भाऊला सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तो महिलांविषयी आक्षेपार्ह  वक्तव्य करत असतो. त्यावेळीच त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु, त्यावेळी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.  


हिंदुस्थानी भाऊच्या मागे असलेली सोशल मीडियाची कंपनी ही भाजपशी संबंधित आहे. या कंपनीचे राज डांगर आणि मनन शाह हे दोघे प्रमुख आहेत. यातील राज डांगर हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (एबीव्हिपी) कार्यकर्ता असून त्यांचे बंधू भाजपमध्ये मोठे नेते आहेत. तर मनन शाह हा भाजपच्या आयटी सेलचे काम पाहतो. गेल्या काही वर्षांपासून हीच कंपनी हिंदुस्थानी भाऊला प्रमोट करत होती, असा आरोप सचिन सावंत यांनी यावेळी केला.


महत्वाच्या बातम्या