भारतातील पहिलं विमान बनवणारे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अमोल यादव यांनी 'माझा कट्टा'वर आपला प्रवास उलगडला.
भारत स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष होत आहेत. मात्र आपण अद्याप या क्षेत्रात मागास आहे. पण महाराष्ट्रातील असा एक भीमाचा बेटा आहे, ज्याने आकाशात उडणारं विमान, घराच्या गच्चीवर बनवलं. तो म्हणजे अमोल यादव.
लहानपणापासूनच पायलट होण्याचं स्वप्न पाहून, मोठं झाल्यावर ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलंच, पण या देशात ज्यांनी कदाचित कोणीही विमान बनवण्याचं स्वप्नही पाहिलं नसेल, ते अमोल यादव यांनी करुन दाखवलं.
अमोल यादव हे शिक्षणानिमित्त 18 व्या वर्षी अमेरिकेला गेले होते. त्याचवेळी त्यांनी मित्रांनी मिळून एक जुनं विमानच खरेदी केलं. त्या विमानाच्या डागडुजीपासून सुरु झालेला अमोल यांचा प्रवास, 'मेक इन इंडिया'च्या निमित्ताने जगासमोर आला.
भारतात कोणी विमान बनवू शकतो का, हा विचारही कोणाच्या मनात आला नव्हता, मात्र प्रत्यक्ष असं विमान अमोल यांनी 'मेक इन इंडिया' विकमध्ये सादर केलं आणि अनेकजण अवाक् झाले.
स्वत: पायलट असून, त्यांनी स्वत:चं विमान बनवण्याचा निर्धार केला होता. त्यामुळेच घराच्या गच्चीवर सुमारे 1600 किलो वजनाचं विमान त्यांनी बनवलं. हे भारतातील पहिलं विमान होतं, जो तिशीतला पोरगा बनवत होता. हेच विमान 'मेक इन इंडिया'त उभं करायचं होतं.
मात्र हे विमान गच्चीवरुन उतरवायचं कसं, हा एक प्रश्न होताच, मात्र जो विमान बनवू शकतो, ज्याला हवेत उडालेलं विमान जमिनीवर कसं उतरवायचं हे माहित आहे, तो गच्चीवरुन विमान खाली उतरवू शकत होता. त्यांनी क्रेन लावून हे विमान खाली उतरवलं.
यापूर्वी अमोल यांनी 2 विमानं बनवली होती. मात्र पहिलं विमान तंत्रज्ञानामुळे पूर्ण होऊ शकलं नाही, तर दुसऱ्या विमानाला केंद्रीय हवाई मंत्रालयाकडून परवानगी मिळाली नाही.
मात्र ही दोन विमानं बनवताना आलेला अनुभव गाठीशी घेऊन, अमोल यांनी तिसरं विमान बनवण्याचा निर्धार केला. या विमानासाठी येणाऱ्या खर्चाची फिकीर त्यांनी केली नाही. अहोरात्र मेहनतीच फळ म्हणजे TAC003 हे विमान होय.
अमोल हे अमेरिकेत प्रशिक्षणासाठी होते, तेव्हा ते 106 हॉर्सपॉवर क्षमतेचं इंजिन होतं. मात्र भारतात त्यांना मुंबईतील कुर्ला मार्केटमध्ये 160 हॉर्सपॉवर क्षमतेचं इंजिन मिळालं. हे इंजिन घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी त्यांच्या आईने मंगळसूत्र विकून त्यांना पैसे उपलब्ध करुन दिले.
हे विमान बनवल्यानंतर ते प्रदर्शनासाठी 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात ठेवायंच होतं. मात्र इथे त्यांना जागाच मिळत नव्हती. या प्रदर्शनात विमानासाठी जागा नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र अमोल यांनी खटाटोप करुन जागा मिळवली. त्यासाठी त्यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी संपर्क साधला. मग पर्रिकरांनी यादव यांची माहिती घेऊन, त्यांना जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश 'मेक इन इंडिया'च्या आयोजकांना दिले.
सुमारे दीडशे एकर जागा
स्वत: विमान बनवणाऱ्या अमोल यादव यांना देशासाठी फायटर प्लेन बनवायचे आहेत. तसंच छोट्या शहरांना जोडणारी विमानंही तयार करायची आहेत. अमोल यांनी याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. मुख्यमंत्र्यांनी अमोल यांना पालघरजवळ सुमारे दीडशे एकर जागा उपलब्ध करुन दिली आहे.
प्रत्यक्षात जागेचा ताबा मिळाल्यापासून 45 दिवसात कंपनी उभा करणं, डिसेंबर 2017 पर्यंत पहिलं विमान तयार करणं आणि पुढील 3 वर्षात 4 विमानं हवेत झेपावण्यास सज्ज होतील, असं टार्गेट अमोल यादव यांचं आहे.
छत्रपती शिवाजी ते बाबासाहेब आंबेडकर
अमोल यादव हे लहानपणापासून छत्रपती शिवरांयाबद्दल वाचत आलेले आहेत. ते त्यांचे आदर्श आहेत. अमोल यादव यांचे वडील आंबेडकर चळवळीशी संबंधित आहेत. त्यांनी आंबेडकरांवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. जे छत्रपती शिवाजी महराजांनी केलं, ज्या आंबेडकरांना समाजाबद्दल केलं, तसंच ध्येय अमोल यादव यांचं आहे.
छोटी विमानं जी सर्वसामान्यांना प्रवासासाठी परवडतील, अशी विमानसेवा उभा करण्यांचं लक्ष्य अमोल यांचं आहे.
बाबासाहेबांनी समाजासाठी श्रम घेतले, त्याप्रमाणे मला महाराष्ट्रासाठी कष्ट घ्यायचं आहे, सर्वांना परवडेल अशा विमानप्रवासाची सुविधा निर्माण करायचं आहे, असं अमोल यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
मुख्यमंत्र्यांनी तातडीने 157 एकर जमीन उपलब्ध करुन दिली आहे. यापूर्वीचा सरकारी बाबूंचा अनुभव पाहता, फडणवीसांनी खूपच जलद प्रक्रिया केली. मात्र मी खाजगी क्षेत्राशी त्यांची तुलना केली असता, ती प्रक्रिया अजूनही स्लो आहे. कारण आपण आधीच निर्णयाअभावी 70 वर्ष उशीर केला आहे, आणखी वेळ लागू नये, अशी अपेक्षा अमोल यांनी व्यक्त केली.
विमान बनवण्याची प्रेरणा
लहानपणी कार्टून पाहताना विमान उडवणाऱ्या 'बल्लू'वरुन विमान बनवण्याची प्रेरणा मिळाल्याचं अमोल यांनी सांगितलं.