मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कऱण्यासाठी राज्यभरासह देशभरातील लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.
महामानवाला वंदन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी केली आहे.


यंदाही 'एक वही, एक पेन' अभियान

गेल्या वर्षी महापरिनिर्वाण दिनी सुरु झालेलं ‘एक वही, एक पेन’ अभियान यंदाही राबवण्यात येत आहे. यंदा सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस हे अभियान राबवण्याचा निर्णय फेसबुक आंबेडकराइट मूव्हमेंट (फ्याम) या संघटनेने घेतला आहे.

चैत्यभूमी परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था

वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. समुद्राच्या जवळच असल्याने चैत्यभूमीच्या परिसरात सागरी पेट्रोलिंग केली जाणार आहे. याठिकाणी दोन हजार पोलिस कर्मचारी आणि तीन हजार समता सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

नोटाबंदीचा परिणाम

दरम्यान नोटबंदीचा परिणाम इथेही दिसून येत आहे. दरवर्षी आठ दिवसांपासूनच विविध आंबेडकरी स्टॉल्सनी फुलणाऱ्या या परिसरात यंदा मात्र तुरळक स्टॉल्स दिसून येत आहेत. तसंच दुरुन येणाऱ्या लोकांनाही नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागत आहे.