दिल्ली : काँग्रेसने (Congress) वोट बँकेच्या राजकारणासाठी आरक्षणासोबत छेडछाड केली, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे. राहुल गांधी बेजबाबदार नेता आहेत, काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांसाठीच आहे, असा पुर्नरुच्चार शाहांनी केला आहे. विरोधकांच्या आरोपांवर अमित शाहांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. केजरीवाल सरकार जनताच पाडणार, विरोधक देशात संभ्रम निर्माण करत आहेत, असं शाहांनी म्हटलं आहे.


कपडे मळलेले म्हणून वॉशिंग मशीनची गरज


भ्रष्टाचारी नेत्यांच्या भाजप प्रवेशावरही शाहांनी उत्तर दिलं आहे. भाजप वॉशिंग मशिन असल्याच्या मुद्द्यावर अमित शाहांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांचे कपडे मळलेले आहेत, त्यामुळेच त्यांना वॉशिंग मशीनची गरज पडते. त्यांचे कपडे मळलेले आहेत, हे त्यांनी मान्य केलं आहे. कुणी धुतलेलं नसतं, जनतेला सगळं माहित आहे, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.


NDA 400 पार नक्कीच करणार, 4 जूनला कळेल


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मी माझा अंदाज सांगितला आहे, बाकीचे तुम्ही तुमच्या चॅनलवर 4 जूनला सांगाल. आमचा पक्ष आता तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आम्ही 400 नक्कीच पार करूच, हे 4 जूनला सिद्ध होईल. आम्ही आमचा जाहीरनामा देशासमोर ठेवला आहे, आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, असंही अमित शाहांनी यावेळी म्हटलं आहे.


बंगालमध्ये भाजप 30 जागा जिंकणार


मतांसाठी ममता बॅनर्जींचं घुसखोरीला समर्थन दिलं आहे. पश्चिम बंगालची जनता त्रस्त आहे. त्यामुळे बंगालमध्ये भाजप 30 जागा जिंकणार असल्याचा विश्वास अमित शाहांनी यावेळी व्यक्त केला आहे. समान नागरी कायदा ऐतिहासिक आहे, असही शाहांनी म्हटलं आहे. इलेक्टोरल बॉण्डच्या मुद्द्यावरही शाहांनी उत्तर दिलं आहे.