मुंबई : राज्यातील राजकारणात भूकंप घडवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांना (Ajit Pawar) सपशेल माघार घ्यावी लागले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला होता. त्यावेळी, अजित पवारांसमवेत 40 आमदार असल्याचे बोलले जाते होते. त्यावेळी, माजी विरोधी पक्षनेते आणि अजित पवारांचे खास असलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा फोन नॉट रिचेबल होता. मात्र, दुपारनंतर जेव्हा ते माध्यमांसमोर आले तेव्हा आपण शरद पवारांसोबत आहोत, मला अजित पवारांच्या शपथविधीबद्दल काहीही माहिती नाही, असे धनंजय मुंडेंनी म्हटले होते. मात्र, अजित पवार यांनी दुसऱ्यांदा बंड केल्यानंतर धनंजय मुंडे थेट अजित पवार गटात शिरले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत ते शरद पवारांवर (Sharad Pawar) टीकाही करायला लागले आहेत. त्याच अनुषंगाने शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, शरद पवारांनी धनंजय मुंडेंवर शेलक्या शब्दात टीका केली. ज्यांचे तुम्ही नाव घेता, त्यांची लायकी नाही, असे शरद पवार म्हणाले. 


राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांसोबत अनेक आमदार गेले. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यामध्ये, धनंजय मुंडेंना कृषीमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या फुटीनंतर बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेत धनंजय मुंडेंनी अजित पवार हेच माझं सर्वस्व असल्याचं म्हटलं. तर, शरद पवार यांचं नाव न घेता टीकाही केली. आता, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. पवार विरुद्ध पवार असाही सामना पाहायला मिळत आहे. त्यात, अजित पवारांकडे असलेल्या धनंजय मुंडेंनी शरद पवारांनी केलेल्या विधानावरुन थेट हल्लाबोल केला होता. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा संदर्भ देत धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर बोचरी टीका केली. अर्थात, शरद पवारांना मुंडेंचे हे शब्द चांगलेच टोचले आहेत. त्यामुळेच, धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर बोलताना शरद पवारांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत शरद पवाराना हा प्रश्न विचारण्यात आला होता. 


''ज्यांचं नाव तुम्ही घेता, त्यांची लायकी नाही, त्यांना कशाकशातून बाहेर काढलं याची जर यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल, असे म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता जबरी पलटवार केला. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग मी आता बोलू इच्छित नाही. त्यांना एक लहान कुटुंबातला, लहान समाजातला एक उदयोन्मुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरुन विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती, हे सगळं माहिती असतानासुद्धा ते आता माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करायला लागले, कुटुंबावर हल्ले करायला लागले त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही. आज शेवटचा उल्लेख त्यांच्याबद्दलचा माझ्याकडून होईल,'' अशी संतापजनक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंकड़ून होत असलेल्या व्यक्तिगत टीकेवर शरद पवारांनी नाव न घेता मुंडेंना चागलंच सुनावल्याचं दिसून येत आहे. 


काय म्हणाले होते धनंजय मुंडे


धनंजय मुंडेंनी थेट शरद पवारांना टार्गेट करताना निगरगट्ट असा शब्दप्रयोग केला होता. "दिलेला शब्द पूर्ण करणारा एकमेव नेता महाराष्ट्रात तो म्हणजे अजितदादा पवार आहे. महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र, मराठवाडा पुढे येईल. सुनेला परकी म्हणता, तुमच्याही घरात देखील लेकी आहेत. एक निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही जर सुनेला परकी म्हणत असाल तर एवढी वेळ वाईट कोणावर येऊ नये. तुम्ही इतकं निगरघट्ट कसे झाला की सूनेला परके म्हणू लागलात", अशा शब्दात मुंडेंनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथील सभेत धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर शाब्दीक वार केला होता.  


हेही वाचा


मराठा समाजाने पुन्हा अडवले, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी निघालेल्या आमदाराची गाडी रोखली, घोषणाबाजी