मुंबई: किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या रविंद्र वायकरांना (Ravindra Waikar) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीने तिकीट दिल्यानंतर सोमय्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गरज पडली तर मी उद्धव ठाकरेंनाही सरळ करू शकतो, पण पक्षाचा लहान कार्यकर्ता असल्याने मी पक्षशिस्त मोडणार नाही असं किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले. उत्तर पश्चिम मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार असून त्या ठिकाणी ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत होणार आहे. 


रविंद्र वायकर यांची कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणात ईडीची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता त्यांना लोकसभेचं तिकिट मिळालं आहे.


भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रवींद्र वायकरांना तिकीट मिळाल्यानंतर त्यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षाचा खूप लहान कार्यकर्ता आहे. मी ना आमदार आहे, ना खासदार आहे, ना नामदार आहे ना कोणताही पदाधिकारी. मी पक्षाचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता असून मला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. मी उद्धव ठाकरेंना सरळ करू शकतो,  पण पक्षाची जी शिस्त आहे त्याच्या बाहेर एक शब्दही बोलू शकत नाही. 


मी आतापर्यंत जे काम केलंय त्याचा माझ्या परिवाराला, सहकाऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला अभिमान असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. 


किरीट सोमय्यांनी केले होते आरोप


रवींद्र वायकर हे ठाकरे गटात असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणात आरोप केले होते. या प्रकरणात वायकरांची ईडी चौकशी सुरू आहे. 9 जानेवारी 2023 रोजी ईडीने वायकरांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप वायकर यांच्यावर करण्यात आला होता. तसंच 'मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. 


अमोल कीर्तिकर विरूद्ध रवींद्र वायकर लढत


सेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरअमोल कीर्तिकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


ही बातमी वाचा: