अहमदनगर : पथदिव्यांचं 40 लाखांचं बोगस बिल अदा केल्याने अहमदनगर महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी गोंधळ घातला. नगरसेवकांनी घोटाळेबाजांवर कारवाईची मागणी केली आहे. मागणीसाठी नगरसेवकांनी सभागृहात खालीच ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. अखेर महापौर मंगला कदम यांनी सहा अधिकार्‍यांची चौकशी करुन निलंबनाच्या कारवाईचा आदेश दिला.


उपायुक्त, मुख्य लेखाधिकारी, इलेक्ट्रॉनिक अभियंता, शहर अभियंता , मुख्य लेखापरीक्षक आणि इलेक्ट्रिकल सुपरवायझर यांची चौकशी करुन कारवाईचा आदेश दिला आहे.

प्रथमदर्शनी घोटाळा झाल्याचं सिद्ध झाल्याने तिघांना महासभेतून तत्काळ बाहेर काढण्यात आलं. सदस्यांच्या मागणीनंतर महापौरांनी सभेतून बाहेर काढलं. या प्रकरणी चौकशी करुन कारवाईचे आदेशापर्यंत बुधवारपर्यंत सभा तहकूब करण्यात आली.

मनपाच्या स्थायी समितीत विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी भांडाफोड केला होता. खोटा प्रस्ताव आणि खोट्या सह्या करुन 40 लाख लाटल्याचं त्यांनी उघडकीस आणलं होतं. या प्रकरणी बोराटे यांनी पोलीसात आणि लाचलुचपतकडे तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनीही पोलिसात फिर्याद देणार असल्याचं सांगितलं. ठेकेदार सचिन लोटके हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.