सोलापूर : मध्यरात्री रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यात काल (शनिवार) रात्री दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घातला. बार्शी-कुर्डुवाडी रोडवर मध्यरात्रीनंतर जाणाऱ्या वाहनांना अडवून सिनेस्टाईल लूटमार करण्यात आली.
हातात शस्त्र घेतलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने वाहने थांबवून प्रचंड दहशत माजवली. एक दोन नाही, तर तब्बल नऊ प्रवासी वाहनं दरोडेखोरांनी लुटली. प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोकड पळवली. ऐन थंडीत प्रवाशांना दरोडेखोरांनी हैराण केलं आहे.
इनोव्हा, स्कॉर्पिओ, अल्टो यांसह खाजही ट्रॅव्हल कंपन्यांच्या दोन बसेसचा समावेश होता. दागिने आणि रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांनी लहान मुलं आणि महिलांना सुद्धा मारहाण केली. तब्बल दोन तास दरोडेखोरांनी प्रवाशांना भीतीच्या वातावरणात ठेवलं. अखेरीस भयभीत झालेले सर्व प्रवासी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंबाजोगाई येथून गोव्याकडे निघालेल्या डॉ. सुधीर धर्मपत्रे यांची इनोव्हा गाडी रिधोरे येथील आरडा पुलाजवळ येताच लुटली. गाडीतील 3 बॅगा दोन चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार त्यांनी कुर्डुवाडी पोलिसात दिली . यानंतर केवळ अर्ध्या तासाच्या फरकात 2 ट्रॅव्हल्स , एक मिनी बस, स्कॉर्पिओ आणि एका अल्टो कारमधील बॅगांची चोरी काही सेकंदात डिकी उघडून करण्यात आली.
विशेष म्हणजे या पुलावरील स्पीडब्रेकर वरून जाताना गाड्यांची डिकी उघडून बॅगा चोरल्याची तक्रार देण्यात आली आहे. काही सेकंदात लक्झरीसारख्या मोठ्या बसची डिकी उघडून बॅगा कशा लंपास होऊ शकतात, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. यातील एका अल्टोकारमधील पर्स चोरताना दोघांना पाहण्यात आल्याची तक्रार या अल्टो चालकाने दिली आहे. समोर गाड्या का थांबल्यात हे पाहण्यासाठी ही अल्टो गाडी थांबवली असता पाठीमागे बसणाऱ्या महिलेच्या मांडीवरील पर्स दोन चोरटयांनी लांबविल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे.
या 6 गाड्यातील चोरीतून तब्बल 8 लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. मात्र तीनही लक्झरीची डिकी उघडी कशी, याचं उत्तर या गाडी चालकांना देता आलेलं नाही. या प्रकारनंतर पोलिसांनी पहाटेपासूनच या परिसराची झडती मोहीम सुरु केली आहे. यामध्ये पांघरुणं भरलेली एक बॅग आणि काही कागदपत्राशिवाय अजून तरी पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही.
बार्शी-कुर्डुवाडी हा रास्ता मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. रोज या मार्गावरून जवळपास 300 लक्झरी आणि शेकडो वाहनं प्रवास करतात. पहाटेच्या या चोरी सत्रामुळे पोलीसही खडबडून जागे झाले आहेत. सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांनी या चोऱ्यांच्या तपासासाठी अधिकची पथकं नियुक्त केली आहेत.