सिंधुदुर्ग : सलग दोन तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांवर पर्यटकांची चांगलीच गर्दी झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. मुख्य धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे माथेरानमध्येही पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.


अंबोलीत वाहतून कोंडी
विकेंडची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी आंबोलीत आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आंबोलीत रविवार असल्याने मुख्य धबधब्यावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे आंबोली घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा फटका बसत आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. 


माथेरान झालं हाऊसफुल्ल
सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटकांनी माथेरान या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातील पर्यटक माथेरानला पोहोचले आहेत. त्यामुळे माथेरानच्या हॉटेलमध्ये पर्यटकांना रुम मिळत नसल्याचं चित्र आहे. 


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना सलग तीन दिवस मिळालेल्या सुट्टीची मज्जा लुटण्यासाठी राज्यभरातील अनेक पर्यटन स्थळ हाऊस फुल्ल झाले आहेत. जगभरात प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. आणि माथेरान मध्ये यावेळी पर्यटकांनी एकच गर्दी झाली आहे.


माथेरानच्या प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात आपल्या तिरंग्याचा रंग देण्यात आल्याने पर्यटक ही आनंदित झाले आहेत. सध्या पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. राज्यभरातून पर्यटक पहिली पसंती म्हणून माथेरानमध्ये येत आहेत. त्यामुळे काही हॉटेल दुपारीच फुल्ल झालेत, तर काही संध्याकाळी. रेस्टॉरंट असो की लॉजिंग, माथेरानचा रस्ता असो की जेवणाचा ढाबा, सगळीकडे पर्यटकच पर्यटक दिसून येत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने मुंबईजवळचे पर्यटक हे माथेरानला पसंती देत असल्याचा चित्र दिसून येत आहे. म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माथेरानचे आकर्षण आहे. त्यात हॉटेल उपलब्ध नसल्याने हॉटेलचालकांवर पर्यटकाना परत पाठवण्याची वेळ आली असून, रुमच शिल्लक नसल्याची माहिती काही हॉटेल चालकांनी दिली आहे.


सिंहगडवर गर्दी
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आज सिंहगडावर मोठी गर्दी झाली होती. सिंहगडाच्या घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाट्यापासून गडावरील गाडीतळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने पर्यटकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला. घाट रस्त्यावर पर्यटक वाहतूक कोंडीत अडकलेले असताना हवेली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस गडाच्या पायथ्याशी पावत्या करण्यात मग्न होते.