Shivsena on Vinayak Mete : मराठा आरक्षण लढ्यातील अग्रणी नेते आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित करताना चौकशीची मागणी केली आहे.


विनायक मेटे यांचा अपघात घातपात आहे का? अशी शंका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, विनायक मेटे यांचा अचानक अपघाती मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. 


ते पुढे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज्यामध्ये नुकतीच मोठं राजकीय उलथापालथ झाली आहे. सत्तांतरासारखी मोठी घडामोड होऊनही विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी या सर्व प्रकरणात चकार शब्दही काढला नाही. याबाबत त्यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. अचानक काल त्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आलं. कोणी बोलावलं होतं? कशासाठी याची चौकशी व्हावी. 


दिलीप पाटील यांच्याकडूनही चौकशीची मागणी 


आज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत सामील होण्यसाठी बीडहून विनायक मेटे मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. दरम्यान, मराठा समाजाच्या बैठकीची वेळ कुणी बदलली याची चौकशी करा, अशी मागणी मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांनी केली आहे. 


दिलीप पाटील मेटे यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आज संध्याकाळी 4 वाजता बैठक होती. मात्र, बैठकीची वेळ बदलली. ही वेळ कुणी बदलली? हा अपघात आहे की घातपात याची चौकशी करावी. मेटे साहेब म्हणत होते मी बीडमध्ये आहे मला कसे शक्य होईल? मात्र, कुणाच्या एकाच्या हट्टापायी वेळ बदलण्यात आली त्याची चौकशी व्हावी. 


इतर महत्त्वाच्या बातम्या