Ambernath News : अंबरनाथमध्ये (Ambernath) घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं संबंध परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घशात माशाचा काटा अडकून अवघ्या 6 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरातील इतर मुलांसोबत खेळता खेळता बाळानं मासा तोंडात टाकला. त्यामुळे श्वास अडकल्यानं बाळाचा तडफडून मृत्यू झाला. अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात ही घटना घडली. संपूर्ण परिसरात या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे. 


सरफराज अन्सारी हे त्यांच्या कुटुंबासह अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात राहतात. त्यांना शहबाज नावाचा 6 महिन्यांचा मुलगा होता. गुरुवारी रात्री शहबाज घराबाहेर इतर लहान मुलांसोबत खेळत होता. तेवढ्या खेळता खेळता तो अचानक रडू लागला. त्यामुळे इतर मुलांनी शहबाजच्या पालकांना याची माहिती दिली. शहबाजची आई आणि वडिलांनी शहबाज खेळत असलेल्या ठिकाणी धाव घेतली. काही केल्यानं शहबाज शांतच होईना. त्यामुळे दोघांनीही त्याला घेऊन एक खाजगी रुग्णालय गाठलं. पण तिथे शहबाजला नेमकं काय झालंय हेच डॉक्टरांच्या लक्षात येईना. त्यामुळे शहबाजच्या आई-वडिलांनी त्याला घेऊन उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठलं. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 


डॉक्टरांनी शहबाज याला तपासलं, त्यावेळी त्याच्या घशात मासा अडकल्याचं आणि त्यामुळे त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. हा मासा डॉक्टरांनी त्याच्या घशातून बाहेर काढला. यानंतर आता सकाळी या बाळाचं शवविच्छेदन करून त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण शोधून काढलं जाणार असल्याची माहिती शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आपल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरजसुद्धा या निमित्तानं व्यक्त होऊ लागली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Crime News : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन दीड महिना अत्याचार, भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार