Maharashtra Konkan News : कोकणातील (Konkan) रिफायनरीच्या मुद्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद समोर आले आहे. उद्योगमंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) गैरहजर राहिले. पण, त्याच बैठकीला हजर राहत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी स्थानिक आमदार म्हणून रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यानंतर रिफायनरीसाठी चाचपणी सुरू असलेल्या गावांमध्ये राजन साळवी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेला. शिवाय त्यांच्या पोस्टरवर शेण देखील फेकले गेले. यानंतर जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशाचा भंग झाल्याच्या कारणास्तव रिफायनरी विरोधी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर देखील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी राजापूर पोलीस ठाण्यासमोर आपल्या समर्थकांसह एकत्र येत या आंदोलकांविरोधात निवेदन देणार आहे. पण, यामध्ये मात्र एक सवाल विचारला जातोय. राजापूर पोलिस ठाण्यासमोर साळवींचं समर्थकांसह होणारं शक्तीप्रदर्शन म्हणजे विनायक राऊत यांना इशारा आहे का? कारण, रिफायनरीच्या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत. पक्षाची भूमिका लोकांसोबत जाण्याची असली तरी साळवी मात्र विकास आणि रोजगाराच्या मुद्यावर रिफायनरीचं समर्थन करत आहेत. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटातील अंतर्गत वातावरण तापलं आहे. त्यामुळे राजापूर पोलीस ठाण्यासमोर शक्तीप्रदर्शन करत राजन साळवी पक्षातील विरोधकांना इशारा तर देत नाहीत ना? असा सवाल देखील आता विचारला जात आहे. विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे 2019 मध्ये राजापूर - लांजा इथल्या मतदारसंघातील उमेदवार अविनाश लाड यांची भेट घेत चर्चा केली होती. महाविकास आघाडीतील नेते म्हणून भेट झाल्याचं राऊत यांनी म्हटलं असलं तरी त्यामुळे राजन साळवी नाराज झाल्याचं मानलं जात आहे. 2024 मध्ये अविनाश लाड यांना काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आणून त्यांना राजापूर - लांजा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा प्लॅन आहे. त्यासाठी राऊत यांनी लाड यांची भेट घेतल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जातं. तर, राजन साळवी यांना रत्नागिरी - संगमेश्वर या मतदार संघातून उभं केलं जाऊ शकतं अशी देखील शक्यता आहे. परिणामी साळवी नाराज असल्याचं मानलं जात आहे.
राजन साळवींच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत चर्चा!
राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या साऱ्या चर्चा साळवी यांनी फेटाळून लावल्या आहेत. पण, साळवी यांची होणारी कुचंबणा, रिफायनरीच्या मुद्यावरील भूमिका यामुळे साळवी यांच्याबाबत काही प्रमाणात नाराजी देखील दिसून येत आहे. त्यामुळे राजन साळवी शिंदे गटात येतील असं प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. पण, साळवी यांनी या साऱ्या शक्यता यापूर्वीच फेटाळून लावल्या आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र
मुंबईत रिफायनरीच्या मिटींगला हजेरी लावल्यानंतर साळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये आर्थिक विकास, रोजगार, पाण्याचा प्रश्न यासारख्या मुद्यांना हात घातला होता.