मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 129 वी जयंती आहे. मात्र, यंदाच्या बाबासाहेबांच्या जयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची भीम जयंती घरातच साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार राज्यभरात आंबेडकरी अनुयायींनी घरातच आंबेडकर जयंती साजरी करत बाबासाहेबांना अभिवादन केलं. राज्यभरात आंबेडकर जयंती कशी साजरी झाली यावर नजर टाकूया
दादर चैत्यभूमीवरवर शांतता
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीम बांधव घरात राहूनच बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहेत. दरवर्षी दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकर जयंती निमित्ताने भीम बांधव येऊन या ठिकाणी दर्शन घेतात. परंतु लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भीम बांधवांनी घरात राहणंच पसंत केलं आहे.
लॉकडाऊनमुळे दीक्षाभूमी बंद
लॉकडाऊनमुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला पहिल्यांदाच दीक्षाभूमीवरील प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन लागू केल्यापासून दीक्षाभूमी बंद ठेवण्यात आली आहे. दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीला दिसून येणारा उत्साह, काढण्यात येणाऱ्या मिरावणुका आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवरील अनुयायांची गर्दी यावेळी नाही. सकाळी 9 वाजता दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते सुरई ससाई यांच्या यांनी चार जणांच्या उपस्थितीत दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं. एवढाच एक छोटेखानी कार्यक्रम आज दीक्षाभूमीत पार पडला.
नंदुरबारमध्ये घराच्या ओट्यावर उभं राहून अभिवादन
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संचारबंदीमुळे, शहादा शहरातील सिद्धार्थनगरमध्ये आंबेडकरी अनुयायांनी आपल्या घराच्या ओट्यावर उभे राहून, सोशल डिस्टन्स ठेवत सामूहिक बुद्ध वंदना करुन ओट्यावर ठेवलेल्या प्रतिमांना पुष्पहार अपर्ण केले.
जळगावात संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन
जळगाव : जळगावमध्ये लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात लॉकडाऊनची सर्व बंधने पाळत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुदायिक वाचन करण्यात आलं. तसंच देशावर नव्हे तर जगावर आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं नमूद करण्यात आलं. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, दिलीप सपकाळे, प्रितीलाल पवार, प्रा. मिंलिद कांबळे हे उपस्थित होते.
घरात मेणबत्ती लावून आंबेडकर जयंती साजरी
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. हीच बाब लक्षात घेऊन परभणीच्या आंबेडकरनगर येथील रहिवाशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रात्री बारा वाजता सर्व कॉलनीमध्ये मेणबत्ती लावून या मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन केले. महत्त्वाचे म्हणजे नेहमी जयंतीनिमित्त परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर जो आंबेडकरी अनुयायांनी फुलून गेलेला असतो, त्याच ठिकाणी आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. प्रत्येक नागरिकाने आंबेडकरांची जयंती घरातच साजरी करण्याचं ठरवत कोरोनाच्या युद्धात आपले मोठे योगदान दिले आहे. त्याचं एक बोलकं चित्र या परभणीत पाहायला मिळाले आणि याच एकजुटीमुळे परभणी जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही हे विशेष.