Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या दमदार यशानंतर आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांची आज (15 जून) पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीच्या दृष्टिकोनातून स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीमध्ये राहणार की नाही?
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट राज्यातील सर्व जागांवर स्वबळावर तयारी करत असल्याची चर्चा असतानाच काँग्रेसने सुद्धा तोच नारा दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीमध्ये राहणार की नाही याबाबत शंका घेतली जात आहे. त्यामुळे आजच्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होत असताना काँग्रेसच्या दोन नेत्यांनी मात्र या पत्रकार परिषदेबाबत कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. ते पूर्वनियोजित नागपूर दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या बैठकीच्या अनुषंगाने विचारण्यात आलं असता या बैठकीचे मला निमंत्रण नसल्याचे म्हटलं आहे. बैठकीची मला माहिती असली, तर बैठकीचा अजेंडा समजला असता, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे दोन्ही काँग्रेस नेते यावेळी उपस्थित नसतील अशी चिन्हे आहेत.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीला मिळालेल्या यशावर महायुतीच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते काय बोलणार आणि काय प्रत्युत्तर देणार? याची उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या