परभणी : जिंतूर (Jitur) येथील शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह (Government Technical Hostel) शिक्षणाऐवजी महाविद्यालयातील दोन गटांतील हाणामारीच्या प्रकरणात नेहमीच चर्चेत राहिले आहे. यावेळी मात्र चक्क विद्यार्थ्यांनीच शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहाची तोडफोड करून जाळले असल्याचा आरोप तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. आर. टी. पाचकोर (Dr. R. T. Pachkor) यांनी केला असून प्राचार्यांनी पोलिसांकडे (Police) याबाबत तक्रारीचे पत्र पाठविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुलांच्या तीन मजली वसतिगृहात सर्व शाखेचे मिळून दीडशेच्या आसपास विद्यार्थी राहतात. वार्षिक परीक्षेचा (Exams 2024) अंतिम पेपर होता. त्याच दिवशी तीन मजली इमारत असलेल्या वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या एकूण वीस खोल्यांपैकी सहा ते सात खोल्यांतील विद्युत बोर्ड, कपाट, बाथरुममधील कमोड, पाईपलाईनची तोडफोड करून सामान ठेवण्याचे लाकडी कपाट जाळल्याचा प्रकार घडला आहे.
प्राचार्यांची विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात धाव
ही बाब दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आल्याची माहिती मिळाली. त्यावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. टी. पाचकोर यांनी पोलिसांत धाव घेऊन जाळपोळ करून तोडफोड करणाऱ्या त्यांच्याच विद्यार्थ्यांच्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, जाळपोळ करणे, शासकीय वस्तू बेचिराख करणे, यांसारखे दखलपात्र गुन्हे नोंद करून दोषींवर कठोर कारवाईचे आरोप निश्चित करण्यासाठी जिंतूर पोलिसांत (Jintur Police) तक्रारीचे पत्र दिले.
पंचवीस ते तीस लाखांचे नुकसान
त्यावर जिंतूर साबा बांधकाम विभागाच्या वतीने घटनास्थळाचा पंचनामा करून अंदाजे पंचवीस ते तीस लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या