मुंबई : 23 मार्चपासूनच प्लास्टिकबंदीची पूर्वसूचना दिली होती, तसेच सगळीकडे जाहिरात करुन जनजागृती केल्याचा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम करत असले, तरी लोकांपर्यंत प्लास्टिकबंदीबाबत नेमकी माहिती पोहचल्याचे दिसत नाही. नागरिकांमध्ये प्लास्टिकबंदीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.


23 जूनपासून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीमुळे कुणी नियमभंग केल्यास महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम 2006 नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या तीन दिवसात कारवाई सुद्धा केली. अनेक महापालिकांनी पहिल्याच दिवशी लाखोंच्या पटीत दंड वसूल केला. त्यामुळे संभ्रमासह नागरिकांमध्ये भीतीचंही वातावरण आहे. कारण नेमक्या कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे, हेच लोकांपर्यंत नीट पोहोचले नाही.

नेमक्या कोणत्या प्लास्टिकवर बंदी, कारवाई कोणावर होणार, कुठे होणार, किती दंड होणार, यासंदर्भात सविस्तर खालीलप्रमाणे :

कोणत्या प्लास्टिकवर बंदी?

प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या)

थर्माकॉल व प्लास्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू (उदा. ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इ.)

हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारी भांडी व वाट्या, स्ट्रॉ, नॉन व्होवन, पॉलीप्रॉपिलीन बॅग

द्रव्यपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप

थर्माकॉल व सजावटीमध्ये करण्यास मनाई आहे.

कारवाई कोणावर होणार?

राज्यातील कोणतीही व्यक्ती व व्यक्तींचा समूह, दुकानदार, शासकीय व अशासकीय संस्था, मॉल्स, शैक्षणिक संस्था, कॅटरर्स, ओद्योगिक घटक, घाऊक व किरकोळ विक्रेता, क्रीडा संकुल, चित्रपट व नाट्यगृहे, समारंभाचे हॉल, वाणिज्यिक संस्थाव कार्यालये, धार्मिक स्थळे व धार्मिक संस्था, हॉले व धाबे, फेरीवाले, वितरक वाहतूकदार, मंडई व स्टॉल

कारवाई कुठे होणार?

सर्व दुकाने व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, सर्व सागरी किनारे, बस व रेल्वे स्थानके, वने व संरक्षित वने, इको सेन्सिटिव्ह क्षेत्र व जेथे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठा असेल त्या सर्व ठिकणी

प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांना दंड काय?

पहिल्या गुन्ह्यासाठी – 5 हजार रुपये

दुसऱ्या गुन्ह्यासाठी – 10 हजार रुपये

तिसऱ्या गुन्ह्यासाठी – 25 हजार रुपये आणि तीन महिन्यांची कैद

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल पत्रकार परिषदेत काय म्हटले?

“प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा नसून, सहा महिन्यांआधी घोषणा केली. त्यावर कोर्टाने तीन महिने वाढवून दिले. एसटी, बस स्टॉप, वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. हे जर एखाद्या पुढाऱ्याला माहिती नसेल, तर त्यांचं अपयश आहे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये.”, अशी जळजळीत टीकाही रामदास कदमांनी मनसे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

प्लास्टिक उद्योग करणाऱ्यांना आणि बेरोजगार झालेल्यांना मागच्या सहा महिन्यांपासून माहिती होतं प्लास्टिकबंदी होणार आहे. प्लास्टिकबंदी एका दिवसात केलेली नाही, असेही रामदास कदम यांनी नमूद केले.

तसेच, 80 टक्के प्लास्टिक उत्पादन गुजरातमध्ये होत असल्याने हजारो कोटींची गुंतवणूक गुजरातची आहे आणि बेरोजगार ही गुजरातचेच लोकं होत आहेत, असे रामदास कदम म्हणाले.

संबधित बातम्या :

काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते? : रामदास कदम

प्लास्टिकबंदीमुळे 15 हजार कोटींचं नुकसान, सुमारे 3 लाख नोकऱ्यांवर गदा

महाराष्ट्रात आजपासून ‘प्लास्टिकबंदी’