नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील रंगावली नदीला पहिल्या पावसात मोठा पूर आला. गेल्या दोन दिवसांपासून नवापूरसह गुजरात राज्यातील आहवा डांग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने रंगावली नदीला यंदा पहिल्यांदा दुथडी भरुन वाहत होती. या मुसळधार पावसामुळे नवापूर नगर पालिकेचा गलथान कारभार समोर आला आहे.

गुजरात राज्यात आहवा डांग जिल्ह्यातील जंगल परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नवापूर शहरातील रंगावली नदीला मोठा पूर आला.



नवापूर शहरातील ग्रामदैवत मरीमाता मंदिराजवळील शहराला पाणीपुरवठा करणारे केटीवेअर धरणाच्या संपूर्ण खिडक्या न उघडल्याने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही मरीमाता शेजारील धरणाचा काही भाग फोडून पाणी बाहेर पडलं आहे. पाण्याचा फोर्स जास्त असल्याने याठिकणी पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने महाकाय खड्डा पडून पाणी वाहून जात आहे.

गेल्या वर्षी हीच परिस्थिती निर्माण झाल्याने देखील नवापूर नगरपालिकेने कोणत्याही खबरदारी घेतली नाही. यामुळे ग्रामदैवत मरीमाता मंदिराला धोका निर्माण होऊन मंदिराचा भाग पाण्यात कोसळू शकतो.

तसेच, करंजी ओवरा येथील नदी किनारी असलेले महादेव मंदिर पाण्यात गेले आहे. रंगावलीच्या पुरात मोठ्या प्रमाणात डांग जंगलातून लाकडे वाहून आले आहे.