भिवंडी : अडीच वर्षीय बालकाचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भिवंडीत घडली आहे. गोलू सुनीलकुमार सिंग असं मृत बालकाचं नाव आहे. सोमवारी संध्याकाळी घरासमोर खेळता खेळता नाल्यात पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील कारिवली गावातील ही घटना आहे.
सिंग कुटुंबीय भिवंडीतील आर. के. इमारतीत पहिल्या मजल्यावर राहतात. सिंग कुटुंबीय राहत इमारतीच्या समोर एक नाला आहे. गोलू वडिलांच्या कुशीत झोपला होता. अचानक झोपेतून उठून गोलू घरासमोरील गॅलरीत खेळायला गेला. खेळता खेळता गोलू घराच्या बाजुला असलेल्या लोखंडी गेटवर चढला आणि तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून नाल्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
मुसळधार पावसामुळे भिवंडीतील नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. दुर्घटना घडल्यानंतर गोलूचा शोध घेण्यास सुरुवात केली, त्यावेळी गोलूचा मृतदेह घरापासून १ किमी अतंरावर मिळाला. याप्रकरणी भोईपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.