अकोला : अकोल्यात एक 'हटके' लग्नसोहळा पार पडलाय. या लग्नात नवरदेव-नवरीच्या मुलांसह नातूही वरातीत थिरकलेत.. यातील नवरदेव 68 वर्षांचा तर नवरी 58 वर्षांची. तुम्हाला हे सारं ऐकून नवल वाटत असेल ना? परंतु अकोल्यात हा 'हटके लग्नसोहळा पार पडला. वर चि. गुलाबराव आणि वधू चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी आशाताई. हळद, मेहंदी, वरात, मंगलाष्टके अन् जेवणावळी असं सारं काही या लग्नात होतं. वधू-वर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आयुष्यात हा योग दुसऱ्यांदा आला होता. अन् तोही तब्बल 41 वर्षांनी. या दांपत्याचं लग्न झालं होतं 11 मे 1981 मध्ये. 


गुलाबराव गावंडे हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री आहेत. बुधवारी त्यांच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस होता. गुलाबराव गावंडे अन् पत्नी आशाताई लग्नाच्या तब्बल 41 वर्षांनी परत बोहल्यावर चढले. हे सारं घडवून आणलं होतं त्यांचे मुलं, मुली, नातू, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी. अकोल्यातील हिंगणा रोडवरच्या गुलाबराव गावंडे यांच्या आश्रमात हा 'शाही' विवाहसोहळा पार पडला. 


...अन् गुलाबराव आणि आशाताई पुन्हा एकदा बोहल्यावर
गुलाबराव गावंडे, कधीकाळी विदर्भातलं शिवसेनेचं फायरब्रँड नेतृत्व. आता ते राष्ट्रवादीत आहेत. गुलाबराव गावंडेंची ओळख वादळी नेता अशी. अनेक संघर्ष आणि वादळं पचवत त्यांचं नेतृत्व उभं राहिलं. अलिकडे गुलाबराव गावंडेंनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत घरातील नव्या नेतृत्वाला पुढं केलं आहे. अनेक संघर्ष पचवलेल्या या नेत्यासाठी कालचा दिवस मात्र सर्वार्थानं वेगळा होता. कारण, तब्बल 41 वर्षानंतर ते दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले होते. परत अक्षता अंगावर झेलत ते भूतकाळात रममान झाले होते. गुलाबराव आणि पत्नी आशाताईसाठी हा सुखद धक्का होता. लग्नमंडपात मंगलाष्टकं सुरू असतांना गुलाबराव आणि आशाताईंच्या डोळ्यांसमोरून आयुष्यातील संघर्ष अन आनंदांच्या आठवणींचा पट झरझर सरकत होता. अंगावर अक्षता पडत असतांना अनेकदा त्यांचे डोळे पाणावले होते. 


मुलांनी केला 'हटके' सिलेब्रेशनचा प्लॅन
11 मे ला गुलाबराव आणि आशाताईंच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस होता. मुलांना कायम आपल्या आई-वडिलांच्या लग्नात नसल्याची खंत असते. गुलाबराव आणि आशाताईंच्या दोन मुलं आणि दोन मुलींना अनेकदा हेच वाटायचं. त्यातच त्यांचे नातूही आजी-आजोबाच्या लग्नात आम्ही का नव्हतो?, असे निरागस प्रश्न विचारत भंडावून सोडायचे. यातूनच प्लॅन तयार झाला या 'हटके' लग्नाचा. मात्र, याचा कोणताही सुगावा त्यांनी या दोघांनाही लागू दिला नाही. या प्लॅननुसार लग्नातले सर्व विधी अगदी दणक्यात पार पडलेत. अगदी हळद, मेहंदी, वरात, मंगलाष्टकं अन जेवणावळही.


अन् लग्नात थिरकली मुलं अन नातवंडं
लग्नाच्या आधी घोड्यावरून गुलाबरावांची भव्य वरात काढण्यात आली. या वरातीत गुलाबरावांच्या परिवारासह मित्र आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते. गुलाबराव गावंडेंना संग्राम आणि युवराज हे दोन मुलं आहेत. संग्राम हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. यासोबतच शितल आणि स्वाती या दोन मुलींसह सात नातवंडही आहेत. गुलाबरावांच्या वरातीत संपूर्ण गावंडे परिवारानं अनेक गाण्यांवर भन्नाट नृत्य केलं. या वरातीत त्यांचे मित्र, कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकही सहभागी झाले  होते. लग्नाची वरात हा या सोहळ्यातील आनंदाचा परमोच्च क्षण होता. वरातीत भजनमंडळासह पोलीसबँड आणि तुतारीचा निनादही होता. 


कोण आहेत गुलाबराव गावंडे? 
1) गुलाबराव गावंडे विदर्भातील राष्ट्रवादीचे बडे नेते. 
2) त्यापुर्वी गुलाबरावांचा विदर्भात शिवसेनेच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा. 
3) युती सरकारच्या मनोहर जोशी मंत्रीमंडळात गावंडे चार वर्ष विविध खात्यांचे राज्यमंत्री. 
4) गुलाबराव तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून तीनदा विधानसभेवर. 1990 मध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघ, 1995 मध्ये अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू (आताचा अकोला पुर्व) आणि 2004 मध्ये अकोला जिल्ह्यातील अकोटमधून विधानसभेवर. 
5) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत बोलू दिलं जात नसल्यामुळे सभागृहात अंगावर रॉकेल घेतल्यानं आले होते चर्चेत. 


अलिकडे नात्यांचे बंध आणि विण सैल होतांना दिसते आहे. सध्याच्या वृद्धाश्रम संस्कृतीत गुलाबराव गावंडेंचा हा लग्नसोहळा इतर मुलांना आई-वडिलांवर प्रेम करण्याचा संदेश देणारा आहे. इतर मुलांनी याचा आदर्श घेत आई-वडिलांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी पुढाकार घ्यावा हीच सदिच्छा.