मुंबई: ज्यांना टीका करायची त्यांना करू दे, पण जवाहर राठोड यांची कविता म्हणजे कष्टकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. जवाहर राठोड नावाच्या कवीची कविता सादर केल्यानंतर पवारांनी हिंदू देवदेवतांचे बाप काढले अशी टीका भाजपनं केली होती. त्याला शरद पवार यांनी आज ती कविता संदर्भासहित पुन्हा सादर करत प्रत्युत्तर दिलं. 


राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी साताऱ्यातील एका भाषणात एक कविता वाचून दाखवली होती. त्यामध्ये ते म्हणाले की, ब्रम्हा-विष्णू-महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि त्या मंदिरात आम्हाला येऊ देत नाहीत. हा तुमचा देव आम्ही आमच्या छिन्नीने बनवला. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय आम्ही सहन करणार नाही.


शरद पवारांच्या याच वक्तव्याचा आधार घेत भाजपने त्यांच्यावर टीका केली. पवार कसे नास्तिक आहेत याचा प्रचार सुरु केला. आणि म्हणून अखेर पवार पुन्हा समोर आले आणि त्यांनी आपलं हे वक्तव्य विपर्यास करुन वापरल्याचा दावा केला.  त्यांनी त्यासाठी जवाहर राठोड यांच्या 'पाथरवट' या कवितेतल्या ओळींचा दाखला दिला. 


भाजपने काय टीका केली होती?
भाजपने शरद पवार यांच्यावर टीका करताना एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये म्हटलं होतं की, "नास्तिक असलेल्या शरद पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातिवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!"


 






राष्ट्रवादीचे उत्तर
भाजपच्या या टीकेला उत्तर देताना भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं. राष्ट्रवादीकडून एक ट्वीट करण्यात आलं असून त्यामध्ये म्हटलं की, झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिंमत तरी ठेवायची होती.


 






पवारांचं भाषण, त्यातली कविता आणि त्यातून झालेला विपर्यास हा आज वादाच्या केंद्रस्थानी राहिला. व्यथा होती कष्टकऱ्यांची आणि वाद रंगला राजकारण्यांमध्ये.


महत्त्वाच्या बातम्या: