अकोला : अकोला जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार समोर आला आहे. एका आठ महिन्याच्या चिमुकलीचं अख्खं आयुष्यच या एका चुकीमुळे पणाला लागलंय. या चिमुकलीला रक्तपेढीतून चक्क एचआयव्ही संक्रमित रक्तं देण्यात आलंय. मुर्तिजापूर तालूक्यातल्या हिरपूर गावातील एका कुटुंबासोबत हा प्रकार घडला आहे. आता या प्रकरणात तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, रक्तपेढीनं निर्दोष असल्याचे सांगत हात वर केले आहे. तर मुलीच्या पालकांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.
आठ महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील हिरपूर गावातील एका कुटुंबात मोठा आनंद झाला होता. हा आनंद होता घरी मुलगी झाल्याचा. मात्र, हाच आनंद सध्या एका भयाण दु:खात बदलला आहे. हिरपूर येथील चिमुकलीला पंधरा दिवसांपूर्वी मुर्तिजापूर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश अवघाते यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं होते. पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. यावेळी या बालिकेला रक्ताची आवश्यकता असल्याने अकोल्यातील बीपी ठाकरे मेमोरियल रक्तपेढीतून रक्त देण्यात आलंय. दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतरही या चिमुकलीची तब्येत सुधारत नसल्यानं अमरावती येथे तिची रक्तचाचणी केल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जणू जमीनच सरकली आहे.
रक्तचाचणी अहवालात 'त्या' आठ महिन्याच्या चिमुकलीला 'एड्स'ची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यानंतर तिच्या आई-वडिलांची एड्स चाचणी निगेटीव्ह आली. त्यानंतर केलेल्या तपासात या चिमुकलीला अकोल्याच्या रक्तपेढीतून मिळालेलं रक्त 'एचआयव्ही' संक्रमित असल्याचं समोर आलंय. यात अवघाते हॉस्पिटलनं आपण रक्तपेढीतून आणलेलं रक्त फक्त चिमुकलीला दिल्याचं सांगत यात हात वर केले आहेत. तर रक्तपेढीने हा दुर्दैवी प्रकार 'विंडो पिरियड' या तांत्रिक गोष्टीमुळे झाल्याचा दावा केला आहे. तर आरोग्य विभागाने आता प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
संबंधित बातम्या :