नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकुळ घातला आहे. त्याचा सामना करत असताना आता एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी आहे HIV संदर्भातली. ह्यूमन इम्युनोडेफिशिएंसी व्हायरस (HIV) म्हणजे एड्स या रोगावर लसीचा शोध गेल्या तीन दशकांपासून घेतला जात आहे. आता ही लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रकोप जगभरात वाढतच चालला आहे त्यात आफ्रिकेत इबोलाची दहशत अजूनही आहे. अशात एचआयव्हीच्या लसीबाबत आलेल्या या बातमीनं आरोग्य क्षेत्रासह एड्सग्रस्तांसाठी आशेचा किरण आहे. जगभरात 2019 मध्ये तब्बल 38 मिलियन लोकांना एचआयव्ही एड्सची लागण झाल्याचं समोर आलं होतं. फेब्रुवारी महिन्यात एचआयव्हीवरील लसीच्या शोधाबाबत घोषणा केली होती.
फेब्रुवारी महिन्यात नॉन प्रोफिट ड्रग डेव्हलपर IAVI आणि स्क्रिप्स रिसर्च इंस्टिट्यूटने या लसीच्या बाबत घोषणा केली होती.या लसीमुळं इम्यून सेल्स उत्पादन वाढू शकेल असं रिसर्चमधून समोर आलं आहे. ज्यामुळं अँटीबॉडी निर्मितीसाठी उपयोग होणार आहे.
लस अद्याप पहिल्या टप्प्यात
HIV च्या लसीबाबत घोषणा झाली असली तरी या लसीला अजून विविध टप्पे पार करावे लागणार आहेत. सध्या या लसीची पहिली ट्रायल झाली आहे. रिसर्चकर्त्यांनी सांगितलं की हा पहिला टप्पा आहे. या लसीमुळं एड्स मुक्त विश्व होण्याकडे पहिलं पाऊल टाकलं असल्याचं बोललं जात आहे.