नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या, 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीकरता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले होते.
संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व काँग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत. कोरोना संकटामुळे एकूण पाच जणांना भेटीची परवानगी मिळाली होती. त्यामुले खासदार संभाजीराजे यांच्या सोबत सर्वपक्षीय नेते उद्या 4.30 वाजता राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.
खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी निवेदन देत होते. एवढे प्रयत्न करुनही त्यांना पंतप्रधानांच्या भेटीची वेळी मिळाली नाही. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची वेळ आता त्यांना मिळाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय सुनावला आहे. केंद्रांने नुकतीच 127 वी घटनादुरुस्ती केली आहे. नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार त्यामुळे पुन्हा राज्यांना दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपतींकडे या शिष्टमंडळाकडून काय मागणी केली जाते याकडे सर्वांच लक्ष आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे सुरूवातीपासून आक्रमक आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही स्तरवर त्यांना प्रयत्न सुरु केले. मराठा आरक्षणासाठी न्यायलयीन लढाईनंतर आता आंदोलनं देखील त्यांनी सुरु केली आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे.
इतर संबंधित बातम्या
- मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्रानं घ्यावी, पण ते कुठे आहेत?, संभाजीराजेंचा अशोक चव्हाणांना टोला
- केंद्र-राज्याच्या भांडणाशी घेणं-देणं नाही, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हवं : खासदार संभाजीराजे
- मराठा आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपने गमावली, लोकसभेत तरी भाजप खासदार बोलणार का? अशोक चव्हाणांचा सवाल